
संगमनेरच्या घुले दाम्पत्यासह सोळा सायकलपटूंमध्ये समावेश
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – रॉयल रायडर्स सायकलिंग क्लबच्या वतीने दि.11 ते 22 डिसेंबरदरम्यान नाशिक ते अयोध्या या 12 दिवसांच्या 1460 किलोमीटर सायकल साहस मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 11 डिसेंबर रोजी सकाळी प्रभू श्री काळारामाचे दर्शन घेऊन निघालेली यात्रा रविवार दि. दुपारी 12.30 अयोध्यानगरीत पोहचली. यावेळी अयोध्यानगरीचे महापौर गिरीश त्रिपाठी यांनी स्वागत कमानीजवळ सर्व सायकलिस्टचे स्वागत केले.
पंचवटीतील प्रभू श्री काळाराम मंदिर 11 डिसेंबर रोजी सायकल साहस मोहिमेला सुरुवात झाली होती. 12 दिवसांच्या या सायकल प्रवासात एकूण 88 रायडर्स सहभागी झाले होते. यात 76 पुरुष व 12 महिला रायडर्स सहभागी झाले होते. 1460 किमीचा हा प्रवास सर्व रायडर्सनी कुठल्याही प्रकारचा बॅकअप न घेता केला. सायकल पंक्चर झाल्यास स्वतःच पंक्चर काढण्याचे अवघड कार्य रायडर्सनेच केले.

इंदोरपर्यंत घाट वळणाचा रस्ता, दुपारचे कड़क ऊन, पहाट व रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत अतिशय उत्स्फूर्तपणे धुळे, सेंधवा, इंदोर, उज्जैन, व्यावरा, बदरवास, दतिया, उरई, कानपूर, बाराबैंकी येथे मुकाम करून सर्व रायडर्सने हा प्रवास पूर्ण केला. राजेंद्र कोटमे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र राऊत, राजेंद्र राजोळे यांचेसह रॉयल रायडर्स परिवाराने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे या रायडर्समध्ये संगमनेर येथील प्रसिद्ध चंदन मसालेचे संचालक चंदन घुले व त्यांच्या पत्नी सौ. वैशाली घुले या जोडीने हा प्रवास पुर्ण केला. तर 77 वर्षांचे बाजीराव कानवडे, त्यांच्या पत्नी हिराबाई कानवडे 70 हे दाम्पत्य या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच 74 वर्षांचे रामदास भागवत यांच्यासह यांच्यासह 65 वर्षांपुढील 28 जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला. 6 जणांची स्वयंसेवक टीम होती. नलिनी मधुकर कड, वर्षा येवले, राजकिशोरी लांडगे, रोहिणी टिळक ( पुणे) कलपना शिंदे, सोनल भोमे, वैशाली घुले, हिराबाई कानवडे, अरुणा राणे, सुजाता जोशी, कामिनी धांडे, लता रविचंद्र यांचा विशेष सहभाग होता.
मिळालेला आनंद शब्दापलीकडचा…
संगमनेरसह नाशिक, पुणे, मुंबई येथून पुरूष, महिला अशा 88 जणांचा ग्रुप नाशिक वरून अयोध्येसाठी रवाना झाला. रस्त्यात अनेक धार्मिक स्थळांचे दर्शन घेत 14 दिवसांत 1400 किलोमीटरचे अंतर पार करून जेव्हा सर्व जण अयोध्येत पोहचेल त्यावेळी झालेला आनंद हा शब्दापलिकडचा होता. कुणाला कोणताही त्रास न होता हा आनंददायी प्रवास पार पडला. आम्ही 24 तारखेला संगमनेरला पोहोचलो. हा अद्भूत आनंद पुढील अनेक काळ सोबत राहणार आहे.
चंदन घुले
चंदन मसाले, संगमनेर



















