नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा- शहरातील सुज्ञ नागरिकांची मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरात मोकाट कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा जणू सुळसुळाट झाला आहे. त्यात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणामुळे आणि त्यांच्या त्यांच्यातील संघर्षामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरून चालणे धाडसाचे ठरत आहे. मोकाट जणांमुळे वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण होतो. तसेच घाणीचे साम्राज्य देखील निर्माण होते. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या, मोकाट जनावरांच्या प्रकरणावर पालिकेने तातडीने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
संगमनेर शहराच्या गल्ली-बोळात, उपनगरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. या कुत्र्यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा या कुत्र्यांनी नागरिकांना चावा देखील घेतला आहे. रस्त्यावर किंवा भरपेठेत कुत्र्यांमध्ये झुंज झाल्यामुळे दुचाकीस्वार, जेष्ठ नागरिक, महिलांना अचानक अडथळा आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. काही कुत्र्यांमध्ये पिसाळलेल्या लक्षणे दिसत असून, त्यामुळे मोठा धोका संभवतो. हीच अवस्था मोकाट जणांवरांची देखील आहे. इतर शहरांतील मोकाट कुत्र्यांना पकडून संगमनेरात सोडले की काय अशी ’चर्चा देखील होत आहे. कारण सध्या शहरात अनेक ठिकाणी हे भटके कुत्रे टोळक्याने दिसत आहे.
या परिस्थितीवर त्वरित आवश्यक ती उपायोजना करणे गरजेची आहे. शहरातील बाजारपेठ, खंडोबा गल्ली, रंगारगल्ली, देवी गल्ली, मालदाड रोड, गुंजाळवाडी रोड, घुलेवाडी रोड अशा अनेक ठिकाणी मोकाट कुत्री आणि मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. खंडोबा गल्ली येथे एका जेष्ठ नागरिकाला नुकताच कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुसह्य वातावरण निर्माण करण्यासाठी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.