वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावर दगडफेक

0
1322

अकोले तालुक्यात रात्री घडला संतापजनक प्रकार
हल्ल्याचा सर्वत्र निषेध
राजूर पोलीसांकडून तपास सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी)

अकोले- वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्यावर तालुक्यातील चितळवेढे परिसरात रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपवते या राजूर परिसरात प्रचार करुन अकोल्याकडे येत असताना ही धक्कादायक घटना घडली. चितडवेढे गावाच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींकडून अचानक दगडफेक करण्यात आली. दैव बलोत्तर होते म्हणून त्यांना काही होऊ शकले नाही. मात्र, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर राजूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित परिसरात नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करणारे त्यांच्या हाती लागले नाही. ही घटना राजकीय वैमनस्यातून किंवा आणखी काही कारणास्तव याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मात्र, अशा प्रकारे उमेदवारावर हल्ला होणे ही निषेधार्थ असून सर्व स्तरातून या निषेध केला जात आहे.


“याबाबत सविस्तर माहिती अशी की, निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सायंकाळी उत्कर्षा रुपवते या राजूर भागात गेल्या होत्या. प्रचार आटोपून राजूरहून त्या निघाल्या होत्या. राजूर घाटात काम चालु असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून चालकाने चितळवेढे गावातून गाडी घातली. मात्र थोडे पुढे आल्यानंतर त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक झाली. या दगडफेकीत त्यांच्या गाडीची काच फुटली. मात्र अंधार असल्याने हल्ला कोणी केला हे लक्षात आले नाही.
दरम्यान, रुपवते यांच्यासह सोबत अन्य एक गाडी देखील होती. त्यांनी खाली उतरुन पाहिले तर कोणीच दिसले नाही. अंधाऱ्या रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे रुपवते आणि त्यांचे सोबत असणारे सर्वच घाबरुन गेले होते. त्यानंतर राजूर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. काही क्षणात राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूला त्यांना कोणीच दिसले नाही. त्यानंतर उत्कर्षा रुपवते यांनी राजूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, ही घटना समजताच अकोले तालुक्यातील कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुपवते यांना धीर दिला. या घटनेमागे कोणाचा हात आहे का? याला राजकीय रंग आहे का? आरोपी कोण आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? ते काणाचे हस्तक आहे? याची सखोल चौकशी करुन आरोपींना तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या घटनेचा पोलिसांनी सखोल शोध लावावा अन्यथा याचे दुरगामी परिणाम समाजिक घटनांवर होतील. म्हणून पोलिसांनी तत्काळ या घटनेला गांभिर्याने घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या हल्ल्यात उत्कर्षा रुपवते यांना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरुप आहेत. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवहान त्यांनी केले आहे.
उत्कर्षा रुपवते किंवा त्यांच्या कुटुंबाचा आजवर कोणाशी वाद नाही. त्यामुळे, कोणावर संशय घ्यावा असे कारण नाही. हा हल्ला केवळ उत्कर्षा रुपवते यांचा विजय दिसू लागल्याने झाल्याचा संशय आहे. प्रस्तापितांच्या पायाखालची वाळु सरकल्यामुळे हा प्रकार होऊ शकतो. वंचितचा विजय जवळ आहे आणि तो आम्ही मिळविणार आहे. आमचे लक्ष विचलित करण्याचा हा कट असू शकतो. त्यामुळे, कुणीही कायदा व सुव्यसस्थेचा प्रश्न निर्माण होईल, आचारसंहितेचा भंग होईल असे कृत्य करु नये. असे आवाहन उत्कर्षा रुपवते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here