गंगामाई घाट व परिसरात वाळू उपसा केल्यास कठाेर कारवाई – प्रांताधिकारी हिंगे

0
1328

प्रचंड खड्ड्यांमुळे पोहताना नागरिकांचा बुडुन मयत झाल्याच्या घडल्या अनेक घटना

नागरीकांची सुरक्षितता जपण्यासाठी महसूल प्रशासन घेणार कठाेर भूमिका

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – प्रवरासह तालुक्यातील मुळा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करांनी अवैध वाळू उत्खनन केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून तो परिसरात पोहण्यासाठी धोकादायक बनला आहे. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक बळी देखील गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे तालुक्यासह शहरातील गंगामाई घाट व परिसरात वाळू उत्खनन किंवा वाहतूक करतांना कोणी आढळल्यास त्यांच्यावर दंडनीय कारवाई बरोबरच गंभीर गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिला आहे. तसेच याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाला कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रवरा, मुळा नदीपात्रात विशेषतः संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरातील प्रवरापात्रात वाळू तस्करांनी केलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे पोहताना नागरिकांचा बुडुन मयत झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रचंड वाळू उत्खननामुळे तयार झालेले खड्डे हे अशा दुर्दैवी घटनांचे इतर कारणांसह एक प्रमुख कारण असल्याचे बातम्या सातत्याने विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. गंगामाई घाट परिसरात व सभोवताली वाळू उत्खननाच्या व वाहतुकीच्या प्रकरणात याआधी महसूल व पोलीस विभागाकडून अनेक वेळा कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु वाळू उत्खनन करणार्‍या व्यक्तींनी अजूनही वाळू उत्खनन सुरू ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. वाळू उत्खनन करणार्‍या व्यक्तींच्या या कृत्यामुळे प्रत्यक्षपणे/अप्रत्यक्षपणे सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हानी झालेली आहे. गंगामाई घाटासह या परिसरात दशक्रिया विधी सुद्धा पार पडत असतात. या दशक्रिया विधी पार पडताना सुद्धा वाळू उत्खननामुळे अडचण येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या दोन्ही बाबीमुळे सामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. यापुढे गंगामाई घाट व सभोतालच्या परिसरात ज्या व्यक्ती वाळू उत्खनन करतील अशा व्यक्तीविरुध्द दंडनीय कार्यवाहीसोबतच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असा इशारा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिला आहे. यापूढे गंगामाई घाट परिसरात वाळू उत्खनन किंवा वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास महसूल मंडळ व पोलीसांना गुन्हा दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकामी कुठल्याही प्रकारची कुचराई करण्यात येऊ नये असे आदेश उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी महसूल व पोलीस विभागाला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here