वाळू स्वस्त होऊनही वाळू तस्करी थांबेना
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- महसूल विभागाने 600 रूपयात 1 ब्रास वाळू उपलब्ध करून दिली. ही वाळू घरपोहच 1 हजार ते 1200 रूपयांपर्यंत मिळणार असली तरी वाळू तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. रविवारी महसूल विभागाने मोठा वाळूचा साठा जप्त केला. तर मंगळवारी रात्री शहरातील तिरंगा चौक येथे अधिकृत खरेदी केलेली वाळू बांधकामासमोरून काही वाळू तस्करांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाळू मालकाच्या वेळीच ही घटना लक्षात आल्याने सदर चोरट्यांनी रिक्षा सोडून तेथून पळ काढला. त्यामुळे वाळू तस्करी व वाळू चोरी थांबणार तर कधी असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
वाळू चोरी, वाळू तस्करी व त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर महसूल विभागाने यावर रामबाण उपाय काढत अधिकृत वाळू विक्री केंद्र सुरू केले. बाजारात 2 ते 3 हजार रूपये मिळणारी वाळू आता सरकारने केवळ 600 रूपयांत उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयानंतर वाळू तस्करी व वाळू चोरी थांबेल असा समज सर्वत्र पसरला होता. परंतू अजूनही प्रवरा नदीपात्रातून रात्रंदिवस चोरट्या मार्गाने वाळू तस्करी सुरू आहे. बांधकाम व्यवसायीकांनी मोठ्या रक्कमेत वाळू आणून त्याचे बांधकामा समोर व घरासमोर डेपो लावलेले असतांना ही वाळू चोरटे चोरून नेत असल्याचे उघड होत आहे.
वाळू बंधी काळात शहरातील तिरंगा चौकातील एका बांधकाम व्यावसायीकाने थेट गुजरात येथून अधिकृत वाळू खरेदी केली होती. या वाळूचा डेपो लावून बांधकाम सुरू होते. दरम्यान मंगळवारी रात्री अज्ञात वाळू तस्करांनी त्यांच्या रिक्षातून ही वाळू वाहून नेण्याचा सपाटा लावला होता. रात्री त्यांची ही हालचाल पाहून वाळू मालक जागे झाल्यानंतर त्यांनी जोराने आवाज दिला. या आवाजाने हे चोर त्यांची रिक्षा टाकून पळून गेले. या प्रकरणी सदर वाळू मालकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्धची फिर्याद दाखल करून घेतली आहे.बांधकाम आणि वाळू हे अतुट नाते आहे. बांधकामासाठी वाळू गरजेची असतांना ती कुठूनही उपलब्ध व्हावी असा अनेकांचा समज असतो. त्यासाठी बांधकाम धारक या वाळू तस्करांना एक प्रकारे मदत करत असतात. परंतू आता शासनाने अधिकृत वाळू केंद्र सुरू केले असे तेही अगदी अल्पदरात. त्यामुळे ज्यांना वाळू गरजेची आहे त्यांनी अधिकृतपणे वाळू खरेदी करावी तरच अशा वाळू तस्करीला आळा बसेल.