संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरचा अभिमान असलेल्या व येथील बालशिक्षण मंडळाचे श्री. दिगंबर गणेश सराफ विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व सध्या सारडा महाविद्यालय नगरची खेळाडू प्रणिता सोमण हिला सन 2019-2020 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रणिता सोमणने सायकल या क्रीडा प्रकारात संगमनेर व महाराष्ट्राला अनेक पदके मिळवून दिले आहे. तिच्या या यशाबद्दल संगमनेरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची घोषणा मावळते क्रीडामंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली. प्रणिता सोमण ही सराफ विद्यालयाची दहावी पर्यंतची सायकलिंग खेळाडू होती. विद्यालय दशेत सायकलिंग बरोबरच तिने बुद्धिबळ, नेटबॉल, ट्ग-ऑफ-वॉर या खेळ प्रकारातही राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती. पुढील शिक्षणासाठी तिने अहमदनगर येथील सारडा महाविद्यालयात प्रवेश घेऊन प्रा. संजय साठे व प्रा. संजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय व एशियन गेम पर्यंत मजल मारत महाराष्ट्र संघाला अनेक पदक मिळवून दिले.
प्रणिताचे वडील बाल शिक्षण मंडळाचे खजिनदार डॉ. प्रफुल्ल सोमण यांनाही सायकलीची आवड असून प्रणिताच्या यशामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा आहे. प्रणिताला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर श्री. दि. ग. सराफ विद्यालय व डॉ. दे. अ. ओहरा कॉलेजमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून आनंद व जल्लोष व्यक्त करण्यात आला. प्रणिताला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. अरविंदराव गणपुले, उपाध्यक्ष डॉ. अरविंदराव रसाळ, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद गाडगीळ, चिटणीस सौ. नीला जोशी, प्रशासक डॉ. आशुतोष माळी, खजिनदार डॉ. प्रफुल्ल सोमण, विद्यालय व कॉलेजचे प्राचार्य कारभारी वाकचौरे, उपप्राचार्य मधुकर कुळधरण, पर्यवेक्षक द्वारकानाथ जाधव, कॉलेज इन्चार्ज प्रा. संजय गुंजाळ, क्रीडा शिक्षक प्रा. सुनिल मंडलिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.