
संगमनेरमध्ये एक रुपयात शुद्ध पाणी उपक्रम ठप्प
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेला एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी हा उपक्रम सध्या ठप्प आहे. ठिकठिकाणी उभारलेले शुद्ध पाण्याचे प्लांट अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यात मोठी अडचण होत आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात वाढत्या तापमानामुळे शुद्ध पाण्याची गरज अधिक जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिकेने त्वरित हे प्लांट सुरू करावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे.
संगमनेरमध्ये नगरपालिका पुरस्कृत पाणी प्रकल्प सुरू झाल्याने कमी किमतीत शुद्ध पाणी मिळू लागले होते. प्रत्येक चौकात व उपनगरांमध्ये उभारलेल्या प्लांटमुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.

शिवाय, गावांमध्ये फिरणार्या शुद्ध पाण्याच्या गाड्यांमुळे अनेक गरजू लोकांना आरओ शुद्ध पाणी सहज उपलब्ध होत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे प्लांट बंद पडले आहेत, ज्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक मुद्दा आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक जाणवत असल्याने हा प्लांट्स सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरपालिकेने कोणतेही कारण न सांगता हे प्लांट त्वरित सुरू करावेत. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून दिला जाईल असे शिवसेना शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी ठणकावून सांगितले. शुद्ध पाणी उपक्रम बंद राहिल्यास जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अजूनही अनेक नागरीकांच्या घरात फ्रीज, अॅक्वा सारखे जलशुद्धीकरण यंत्र नाहीत. त्यामुळे त्यांना या जलशुद्धीकरण केंद्रातील थंड पाण्याचा मोठा उपयोग होत असतो. पालीका प्रशासनाने बंद पडलेले अॅक्वा प्लांट त्वरीत सुरू करून उन्हाळ्यात नागरीकांना दिलासा द्यावा.