शिर्डीत गद्दारीचा शिक्का पुसता येईना

0
1419

भाऊसाहेब वाकचौरेंमुळे महाआघाडीला चिंता

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- राजकारणात तसे पाहिले तर आरोपांना फार काही महत्व नसते. परंतु काही नेत्यांवर एखादा शिक्का बसला तर तो लवकर पुसला जात नाही. असाच गद्दारीचा आणि तुप चोरीचा शिक्का शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर बसला आहे. मात्र या शिक्क्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. महाविकास आघाडीत जागावाटपात शिर्डीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड चुरस होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी बाजी मारत शिवसेनेला धोका देत अनेक पक्षांतर केलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनाच उमेदवारी दिली. शिवसेना व ठाकरेंना धोका देणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांना गद्दार, धोकेबाज, खोके घेणारे म्हणून ठाकरे आज हिणवत असले तरी तीच गद्दारी करणार्‍या भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाने दिलेली उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकांना रूचलेली नाही तशी ती काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील रूचलेली नाही. महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गद्दार म्हणून टिका केली जात असेल तर तोच निकष भाऊसाहेब वाकचौरे यांना देखील लागू होतो. केवळ पदासाठी पुन्हा शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला असला तरी त्यांना जनतेच्या व शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान हा मतदारसंघ काँग्रेसचा पुर्वीचा बालेकिल्ला राहिलेला होता. परंतु बदललेल्या राजकीय समीकरणानंतर तो शिवसेनेचा गड बनला आहे. परंतु शिवसेनेकडे निष्ठावंत चेहरा नसल्याने काँग्रेसने या जागेवर दावा केला होता. राज्य महिला आयोगाच्या सदस्सा उत्कर्षा रूपवते यांच्या रूपाने नवा चेहरा काँग्रेसकडे होता. पक्षाने जोर लावला असता तर ही जागा पुन्हा महाविकास आघाडीला सहज मिळवता आली असती. परंतु आता अनेक पक्षांतर, अनेक पराभव पहाणारे भाऊसाहेब वाकचौरे या उमेदवारावर महाविकास आघाडीला विसंबून रहावे लागत आहे.
भाऊसाहेब वाकचौरे हे जरी प्रचाराला लागले असले तरी त्यांच्या सोबत अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी होताना दिसून येत नाही. काही ठराविक कार्यकर्त्यांना घेऊन वाकचौरे मतदारांच्या गाठीभेटी व बैठका घेत आहे. मात्र या बैठकांमध्येही कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असल्याचे दिसत नाही. तसेच हेवेदावे, वादविवाद याचा भडका उडत आहे. काल संगमनेरमध्ये देखील वाकचौंरेंसमोरच दोन गटात तुफान राडा झाला. वाकचौरेंची हीच परिस्थिती सर्वत्र होणार असेल तर महाआघाडीला आपली हक्काची जागा गमविल्याशिवाय पर्याय नाही.

शिर्डी लोकसभेच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध – उत्कर्षा रूपवते

महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून याचा फटका महाविकास आघाडीला निकालात बसणार आहे.शिर्डी लोकसभेतील मतदारांना कुरघोडीच्या राजकारणात रस नसून त्यांना विकासासाठी नवीन व युवा पर्याय हवा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याचा विचार करण्याची गरज होती व अजून वेळ गेलेली नाही.
मी शिर्डी लोकसभेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असून, येणार्‍या निवडणुकीत मतदारांना योग्य पर्याय देण्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस पक्षाने अजूनही विचार करावा व या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करायला लागली तरी पक्षाने ती करावी व तशी परवानगी आम्हाला द्यावी.

उत्कर्षा रूपवते
सदस्या – राज्य महिला आयोग
व युवा नेत्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here