पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात शरद तुपविहीरे प्रथम

0
1008

प्रतिमा वाकचौरे व विशाल कोल्हे द्वितीय तर पोपट सोनवणे तृतीय

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रा. शरद तुपविहिरे यांनी 76 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रतिमा वाकचौरे व विशाल कोल्हे यांनी प्रत्येकी 75 टक्के गुण मिळवून द्वितीय तर पोपट सोनवणे यांनी 63 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रशांत शिंदे व संजय जेडगुले यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली आहे.


मागील तेरा वर्षांपासून प्रा. डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. विविध प्रात्यक्षिके, सराव सत्र व इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे अहमदनगर बरोबरच नाशिक, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातूनही अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेतात. नोकरी, व्यवसाय करणारे किंवा गृहिणी यांच्या सोयीसाठी आठवड्यातून एकदा प्रत्येक रविवारी सकाळी संगमनेर महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. पत्रकारिता किंवा लेखन कौशल्य शिकू इच्छिणार्‍यांसाठी या अभ्यासक्रमात विविध भाषेचे विविध पैलू व वेगवेगळ्या माध्यमांसाठीची लेखन कौशल्ये शिकवली जातात. मुद्रित माध्यमांबरोबरच दूरचित्रवाणी, नभोवाणी तसेच शासनाच्या विविध विभागात, विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीच्या संधी या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध होऊ शकतात. पत्रकारितेबरोबरच मराठी भाषेचे विविध पैलू अधिक चांगल्या पद्धतीने शिकू इच्छिणार्‍या शिक्षकांचाही या अभ्यासक्रमाला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो.


उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी अभिनंदन केले आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी प्रा. सुशांत सातपुते (97667 60926) यांच्याशी संगमनेर महाविद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा अभ्यासक्रम म्हणजे केवळ पत्रकारितेची तांत्रिक माहिती देणारा कोर्स नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर समृद्ध झाल्याचे समाधान मिळेल. या अभ्यासक्रमात वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि नभोवाणी या माध्यमांचे प्रात्यक्षिकांसह सखोल ज्ञान देण्याबरोबरच भाषिक कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो, त्यामुळे पत्रकारिता करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षण किंवा इतर क्षेत्रात कार्यरत असणारांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. डॉ. संजय मालपाणी (कार्याध्यक्ष – शिक्षण प्रसारक संस्था)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here