शिक्षणमहर्षी विद्यालय ; ‘प्रदूषण विरहीत साहित्य’ निर्मितीचा प्रकल्प
युवावार्ता (प्रतिनिधी)
तळेगाव दिघे –
राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्फत संगमनेर येथील देवेंद्र ओहरा विद्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शिक्षणमहर्षी गुलाबराव गोविंदराव जोंधळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सिद्धांत हरिभाऊ दिघे या विद्यार्थ्याने मोठ्या गटात सादर केलेल्या ‘मशरूम प्रजातीपासून प्रदूषण विरहीत साहित्य निर्मिती’ अर्थातच मायसीलीयम तंत्रज्ञान प्रकल्प नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत अव्वल ठरला. या प्रकल्पाची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत तळेगाव दिघे येथील शिक्षणमहर्षी गुलाबराव जोंधळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सिद्धांत दिघे याने ‘मशरूम प्रजातीपासून प्रदूषण विरहीत साहित्य निर्मिती’ या प्रकल्पाचे सादरीकरण केले. याकामी त्यास प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे, विज्ञान विभाग प्रमुख प्रताप जोंधळे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘मशरूम प्रजातीपासून प्रदूषण विरहीत साहित्य निर्मिती’ या प्रकल्प संशोधनाने मशरूम प्रजाती आणि सोयाबीन, गहू व अन्य पिकांच्या भूश्यापासून थर्माकोल व लाल मातीच्या विटाना पर्याय उपलब्ध करण्यात आला. किंमत कमी, वजन कमी, वाहतुकीसाठी सोपे, उत्पादन खर्च कमी, प्रदूषण विरहीत, आरोग्यास हानिकारक नाही, अशा पर्यावरणपूरक विटा तसेच थर्माकोल ऐवजी मशरूम प्रजाती व भूश्यापासून प्रदूषण विरहीत साहित्य निर्मितीचा पर्याय देण्यात आला.
सर्वत्र बांधकामासाठी सर्रास लालमातीच्या विटांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, मात्र या विटांची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. इलेक्ट्रिक उपकरणांचे पॅकींग तसेच पत्रावळी, चहाचे कप तसेच अन्य अनेक ठिकाणी थर्माकोलचा वापर केला जातो, मात्र ते आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे सदर मायसीलीयम तंत्रज्ञानप्रकल्पाद्वारे नैसर्गिक घटक असलेल्या मशरूम प्रजातीपासून थर्माकोल व लालमातीच्या विटांना पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अत्यंत कमी खर्चात घरांसाठी परवडणाऱ्या विटा तसेच थर्माकोल ऐवजी साहित्य मिर्मिती शक्य असल्याकडे सदर प्रकल्पातून लक्ष वेधण्यात असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या सदर प्रकल्पाची विभागीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली. थर्माकोलमुळे फुफुस, त्वचा, जीभेचा कर्करोग होवू शकतो. लालमातीच्या विटांची निर्मिती करताना प्रदूषण होते. त्याऐवजी मायसीलीयम तंत्रज्ञानअर्थातच मशरूम प्रजातीपासून प्रदूषण विरहीत साहित्य निर्मिती केल्यास प्रदूषण होणार नाही तसेच आरोग्य समस्या उद्भवणार नाहीत, असे प्रकल्प प्रमुख विद्यार्थी सिद्धांत दिघे याने सांगितले.सदर प्रकल्पाची विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल विद्यार्थी सिद्धांत दिघे यांचे महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक प्रा. दिपक जोंधळे, कार्याध्यक्ष दत्तातभाऊ जोंधळे सहित मान्यवरांनी कौतुक करीत विभागीय स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या.