१६ ते २२ जानेवारी नागरिकांना खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीची संधी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नव नवीन उद्योगाची, वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील 17 वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते.
गुरूवार दि. 16 जानेवारी पासून सुरू होत असलेल्या या बिझनेस एक्स्पोचे उद्घाटन संमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संपन्न होणार असून संगमनेर शहर पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख, जीएटी कोऑर्डिनेटर राजेंद्र गोयल, लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे संपन्न होणार आहे.
या एक्स्पोमध्ये अवघ्या महाराष्ट्रातून उद्योजक स्टॉल लावणार आहेत. फन, फुड आणि शॉपिंग अशी या एक्स्पोची थीम असून तरूण, तरूणी, पुरूष, महिला आदींना खरेदीसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध फन गेम्स चा आनंद घेण्यात येणार आहे.
लायन्स सफायरचे संस्थापक अध्यक्ष प्रकल्प प्रमुख एम.जे.एफ गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा व त्यांच्या टीमने मोठ्या मेहनतीने संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
बिझनेस एक्स्पोला संगमनेरकरांचा उदंड प्रतिसादही मिळत असतो. अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. यावर्षी सफायर बिझनेस एक्स्पो संपूर्ण एक आठवडा चालणार असून 16 ते 22 जानेवारी पर्यंत संगमनेरकरांसाठी खुला राहणार आहे. सकाळी 10 ते 4 च्या दरम्यान सर्वांना प्रवेश मोफत असून संध्याकाळी 4 नंतर 20 रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्या या उपक्रमात लायन्स सॅफ्रॉन फायरने व्यापारवृध्दी, व्यवसायाप्रती कटीबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे.
तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या टीमने केले आहे.