महिला सुरक्षेला प्राधान्य द्या, आंदोलनकर्त्यांची एकमुखी मागणी
या आंदोलनामध्ये संगमनेर मधील IMA, NIMA, STGPA, STMA, HMAS, IDA, सर्व वैद्यकीय संघटना, संगमनेर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स, जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन, युवक काँग्रेस आणि सर्व महिला बचत गट, रोटरी क्लब, लायन्स क्लब, सॅटर्डे क्लब, वैद्यकीय विद्यार्थी वतीने पदयात्रा व कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी) – कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. मृत महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या एका आरोपीने नाही तर आणखी अनेक आरोपींनी केल्याचा दावा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. थरकाप उडवणारी आणि माणूसकीला काळिमा फासणार्या या घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी व महिला डॉक्टरांसह महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे या मागणीसाठी संगमनेरात सर्व डॉक्टर संघटना, वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कँडल मार्च काढून निषेध केला.
कोलकता येथे पीडित डॉक्टरवरील अत्याचारात अनेक आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असून देखील शासनाने तात्काळ त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे पडसाद उमटले. महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर पश्चिम बंगालमधल्या ज्युनिअर डॉक्टर्सने सलग सहा दिवस कामबंद आंदोलन केलं. कँडल मार्च आणि प्रदर्शन करत आरोपीला कठोर शिक्षा करत न्यायाची मागणी केली आहे. तर संगमनेर येथे शनिवारी सर्व डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळून दिवसभर बंद पाळला.
सायंकाळी येथील मालपाणी लॉन्स या ठिकाणी निषेध सभा घेत कँडल मार्च सुरू झाला. नाशिक रोड, बसस्थानक पर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी या मोर्चात डॉक्टर्स, विद्यार्थी, विविध महिला संघटना, तरूण-तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हणाले की, डॉक्टर्स वैद्यकीय सेवा करत असताना आपल्या जीवाची बाजी लावत असतात. रूग्णसेवेसाठी अहोरात्र झटत असताना त्यांच्यावरच अनेक वेळा मारहाण, अत्याचार, हत्या असे गंभीर प्रकार होत असतात. डॉक्टरांसाठी कायदा आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही.
कोलकाता येथील घटनेत डॉक्टर महिलेवर एकाच वेळी अनेक जणांनी अत्याचार करत तिच्यावर 14 हून अधिक तीव्र जखमा करून निर्घूणपणे हत्या करण्यात आली. शासनाने गंभीर दखल घेवून महिलांसाठी व डॉक्टरांसाठी कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी करत महिलांना सुरक्षा द्यावी. वारंवार निषेध आणि कँडल मार्च काढून हा प्रश्न सुटणार नाही तर वेळप्रसंगी डॉक्टरांनाही तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.