सेवा समितीचा प्रभागात प्रभाव

विकास हीच आमची एकमेव दिशा – कविता कतारी
शहराचा विकास आणि प्रभाग 13 ची प्रगती हीच आमची प्राथमिकता आहे. बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे यांनी केलेल्या कामांचा ठसा पुढे नेत, त्यांच्या व्हिजनची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्व उमेदवार कटिबद्ध आहोत. प्रभागातील सर्व नागरिक संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर-
संगमनेर नगरपरिषद निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग क्रमांक 13 राखीव (अनुसूचित जाती महिला) जागा याठिकाणी यंदा तुफानी आणि रोमहर्षक लढत रंगणार आहे. या प्रभागात दोन्ही शिवसेनेच्या आजी-माजी शहरप्रमुखांच्या पत्नी आमनेसामने उभ्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीबाहेर पडून अपक्ष उमेदवार रिंगणात आणला असून, माजी नगरसेवकाची पत्नीही मैदानात उतरल्याने या प्रभागात महिला उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. मात्र या सर्वांमध्ये संगमनेर सेवा समितीचा प्रभाव जोरदार जाणवत असल्याने, संपूर्ण शहराचे लक्ष सध्या या प्रभागाकडे खिळले आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात व शिवसेनेचे खंबीर नेतृत्वकर्ता माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा समितीची मोहीम दमदार गतीने सुरु आहे.कविता अमर कतारी सिंह निशाणीवर मैदानात सेवा समितीच्या वतीने शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या पत्नी कविता अमर कतारी सिंह निशाणीवर निवडणुकीत उतरल्या आहेत. अमर कतारी हे हिंदुत्ववादी, लढवय्ये शिवसैनिक म्हणून परिचित असून, शिवसेना शहरप्रमुखपदाच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. पोलिस स्टेशन, तहसील, नगरपालिका अशा विविध विभागांमध्ये सामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याची त्यांची ओळख आहे.

हिंदुत्ववादी संघटना, शिवजयंती उत्सव समिती व विविध सामाजिक कार्यांमुळे त्यांच्या कुटुंबाचा प्रचंड जनसंपर्क या प्रभागात मजबूत आहे. थोरातांच्या प्रचारात आघाडीवर राहून कतारी दाम्पत्यांनी भूमिका पार पाडली होती. विधानसभा निवडणुकीत अमर कतारी व कविता कातरी यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासाठी खास मैदानात उतरून मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम राबवली होती. शहर विकासासाठी राजकीय भेद विसरून सेवा समितीत सामील झालेल्या शिवसेनेला नागरिकांचा व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

माजी नगरसेवक शैलेश कलंत्रींचेही जोरदार अस्तित्व
या प्रभागात माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांचा मजबूत जनसंपर्क, सक्षम तरुण टीम आणि उल्लेखनीय कामगिरी हेदेखील निर्णायक घटक ठरत असून, नागरिकांमधून कविता कतारी आणि शैलेश कलंत्री हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. प्रभाग 13 मध्ये सेवा समितीचा जोरदार बोलबाला जाणवत असून, ही लढत शहरातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे.

















