महिलाराजाची चाहूल, पण सोडतीत महिला सहभाग शून्य


प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
प्रभाग 1 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 1 ब – सर्वसाधारण, प्रभाग 2 अ – अनुसूचित जाती, प्रभाग 2 ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 3 ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 ब – सर्वसाधारण, प्रभाग 5 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 5 ब – सर्वसाधारण, प्रभाग 6 अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 ब – सर्वसाधारण, प्रभाग 7 अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 ब – सर्वसाधारण, प्रभाग 8 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 8 ब – सर्वसाधारण, प्रभाग 9 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 9 ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 ब – सर्वसाधारण, प्रभाग 11 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 11 ब – सर्वसाधारण, प्रभाग 12 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 12 ब – सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 अ – अनुसूचित जाती महिला, प्रभाग 13 ब – सर्वसाधारण, प्रभाग 14 अ – सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 ब – सर्वसाधारण, प्रभाग 15 अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 15 ब – सर्वसाधारण महिला.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर गती मिळाली आहे. संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आज बुधवारी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.
ही सोडत संगमनेर येथील प्रांताधिकारी तथा पिठासन अधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे, तसेच राजेंद्र गुंजाळ आदी अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि अधिकार्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली.

महत्त्वाच्या नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठरली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत संगमनेर नगरपरिषदेवर महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह नगरपरिषद क्षेत्रातील 15 प्रभागांपैकी तब्बल 50 टक्के जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
महिलाराजाची चाहूल, पण सोडतीत महिलांचा अभाव.
आरक्षण प्रक्रियेनंतर संगमनेर नगरपरिषदेत महिला प्रतिनिधित्व वाढणार हे निश्चित झाले असले तरी आजच्या सोडतीसाठी एकही महिला उपस्थित नसल्याचे विशेष लक्षवेधी ठरले. महिलांचे राजकारणात वाढते योगदान अधोरेखित होत असताना, अशा निर्णायक क्षणी त्यांचा सहभाग न दिसणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. दरम्यान, संभाव्य उमेदवारीची तयारी करणार्या अनेक पुरुष इच्छुकांनी आजच्या सोडतीसाठी मोठी गर्दी केली होती. परंतु त्यांच्या अपेक्षांवर विरजण पडले – कारण अनेकांच्या प्रभागांमध्ये महिला, मागासवर्गीय किंवा अनुसूचित प्रवर्गांसाठी जागा आरक्षित झाल्या. त्यामुळे काहींच्या चेहर्यावर नाराजी व निराशा स्पष्ट दिसत होती.
आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता सर्वांचे लक्ष उमेदवार निवडीकडे वळले आहे. प्रमुख पक्षांच्या बैठका आणि अंतर्गत समीकरणांना आता वेग येणार आहे.
