
चोरी, तस्करी, हाणामारी, अवैध धंदे जोरात सुरू
संगमनेर (प्रतिनिधी) –
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात संगमनेर देखील मागे नाही. पोलिस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे संगमनेर शहर गुन्हेगारीचे हब बनते की काय अशी भीती येथील नागरीक व्यक्त करत आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दागिने चोरी, घरफोड्या, हाणामार्या, दादागिरी, अवैध कत्तलखाने, जुगार, मटका, बनावट दारू, गांजा तस्करी, वाळू तस्करी, धार्मिक तणाव असे अनेक अवैध प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मात्र जबाबदार यंत्रणाच यात आपले हित पहात असल्याने याला आळा घालणार कोण? असा प्रश्न येथील त्रस्त नागरिक उपस्थित करत आहेत.
संगमनेर तालुक्यात काही महिन्यांपूर्वी नवीन पोलिस अधिकारी रुजू झाले आहेत. नुकत्याच दिवाळी आणि विधानसभा निवडणुक पार पडली. त्यात हे अधिकारी व्यस्त होते. परंतु इतर गुन्हेगारी घटनांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले. आणि त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तींनी घेतला. शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यात प्रामुख्याने चालत्या महिलांच्या गळ्यातील दागिने कोणीतरी येऊन भररस्त्यात हिसकावून घेत आहेत. घराबाहेर गेले, गावाला गेले तर कधी घरफोडी होईल हे सांगता येत नाही. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
शहरातील काही ठराविक ठिकाणी तर वारंवार हाणामारीच्या घटना घडत आहेत. त्या परिसरातील अनेक जणांवर वारंवार गुन्हे दाखल होत असताना देखील त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही. अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. रात्रंदिवस बेकायदा कत्तलखाने, वाळू उपसा सुरू आहे. पोलिस ठाण्यात हप्तेखोरी जोरदार सुरू आहे. त्यामुळे बाहेरच्या या गंभीर प्रकाराकडे पहाण्यास कुणालाही वेळ नाही. तसेच दाखल गुन्ह्यांची माहिती देखील दडवून ठेवण्याचे काम संबंधीत अधिकारी कर्मचार्यांकडून केले जाते.