सोनांबेकर हॉस्पिटल मधील डॉक्टरांविरोधातील एकतर्फी प्रचार थांबवा

0
59

अधिकृत अहवालाची प्रतिक्षा करा – आयएमएची भूमिका

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनने अलीकडे सोशल मीडिया व काही माध्यमांतून प्रसारित होत असलेल्या माहितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः डॉ. अभिजीत कोरडे यांच्याबाबत एकतर्फी, अपूर्ण व पडताळणीविना माहिती पसरवली जात असल्याने डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसत असून वैद्यकीय क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, फेब्रुवारी 2025 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर दत्तात्रय दळवी यांना सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 28 फेब्रुवारी रोजी डॉ. कोरडे यांनी त्यांच्यावर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली होती. ही प्रक्रिया नियमानुसार व कोणतीही घाईगडबड न करता पार पडल्याचा दावा आयएमएने केला आहे. नातेवाईकांकडून करण्यात आलेले आरोप रात्री घाईत उपचार झाले किंवा गँगरीन झाला हे आरोप उपलब्ध माहितीनुसार चुकीचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सदर उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आले होते. पुढील उपचारादरम्यान रुग्णाला Acute Kidney Injury (AKI) ही गंभीर गुंतागुंत निर्माण झाली. त्यानंतर आवश्यक प्राथमिक उपचार करून, पूर्णवेळ नेफ्रोलॉजिस्ट उपलब्ध असलेल्या उच्चस्तरीय रुग्णालयात रुग्णाला रेफर करण्यात आले. दुर्दैवाने, रेफरलनंतर सुमारे तीन आठवड्यांनी डायलिसिसदरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.
आयएमएच्या मते, या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा वैद्यकीय त्रुटी झाली आहे का, याचा अंतिम निष्कर्ष अद्याप लागलेला नसून, अहिल्यानगर सिव्हिल सर्जन यांचा अधिकृत अहवाल येणे बाकी आहे. तसेच न्यायालयाने केवळ एपआयआर नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले असून डॉक्टर दोषी असल्याचे कोणतेही निष्कर्ष अद्याप नोंदवलेले नाहीत.

याशिवाय, या प्रकरणाशी थेट संबंध नसताना डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांनाही सोशल मीडियावर लक्ष्य केले जात असल्याची बाब आयएमएने निषेधार्ह ठरवली आहे.आयएमएने प्रशासन व न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, निष्पक्ष व तथ्याधारित चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, अधिकृत अहवाल येण्यापूर्वीच सोशल मीडियावर चालणारी मीडिया ट्रायल थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयएमएची नागरिकांना विनंती आहे की, अफवा, अपूर्ण माहिती व भावनिक एकतर्फी मांडणी टाळावी. सत्य परिस्थिती समोर येईपर्यंत संयम बाळगावा आणि कोणालाही आधीच दोषी ठरवू नये. घडलेल्या या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून, आता सर्वांचे लक्ष अधिकृत चौकशी अहवालाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here