महसूल सप्ताह नेमका कुणासाठी ?
खरे लाभार्थी घरीच ; अनेकांना निमंत्रणच नाही !
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर मर्यादेत निपटारा होऊन सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट महसूल दिनानिमित्ताने राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र संगमनेरात महसूल सप्ताहाच्या दिवशीच अनेक शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचल्याने नक्की महसूल सप्ताह कुणासाठी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी (दि 4) शहरात यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ, यांच्यासह स्थानिक प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. मात्र जाणूनबुजून स्थानिक महसूल प्रशासनाने अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच अनेक शेतकऱ्यांनी गमे यांना महसूलच्या चुकांसंदर्भात तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. त्यामुळे संगमनेर – अकोले तालुक्यातील शेतकरी मात्र महसूल विभागावर नाराज असून महसूलचे कर्मचारी चुकीचे काम करत असल्याचे दाखवून दिले.
व्यापक अभियानातून विशेष मोहिमेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतीमान करण्याचा संकल्प असून या अभियानात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही महसूलमंत्र्यांनी केले होते. मात्र याठिकाणी अनेकांना निमंत्रण नसल्याचे जाणवले. सप्ताहाचे आयोजन केवळ शासकीय स्वरुपाचे न करता या माध्यमातून आपल्या विभागातील अधिकारी- कर्मचार्यांचा लोकांशी संवाद कसा होईल, असा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते मात्र या कार्यक्रमात फक्त 10 टक्केच लोक आलेत तर 90 टक्के नागरिक घरीच आहेत, त्यांना या योजनेबद्दल काहीच माहिती नाही. तसेच हा कार्यक्रम शहरात घेण्याऐवजी गावागावात घेतला तर प्रभावी ठरेल असे शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आतापर्यंत कधीच महसूल कार्यालयांची स्वच्छता झाली नसेल तेव्हढी आजच्या निमित्ताने झाल्याचे दिसून आले. रोज प्रशासकीय भवनात इतरत्र गुटखे खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात. परंतु महसूल सप्ताहाच्या निमित्ताने कधी नव्हे ते स्वच्छ झाले. परंतु इमारतीमधील स्वच्छता गृहे आत जाण्यालायक नव्हते. त्यामुळे हा फक्त दिखावा होता का असा प्रश्न नागरिकांनी केला.
माझ्या शेतात तलाठी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळत नाही मात्र इतर शेतकऱ्यांना सोयाबीनची भरपाई मिळाली, तसेच कांद्याची ही नुकसान झाली मात्र आम्हाला 12 हजार 900 रुपये आले आणि ज्यांचे कांदेच नाही त्या शेतकऱ्यांना 17 हजार हेक्टरी पैसे मिळाल्याने आम्ही काय करावे.?
शेतकरी, माळेगाव पठार
2021 – 22 मध्ये माळेगाव पठार गावात आलेल्या निधीत तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. सदर निधी वाटपाची चौकशी व्हावी. तसेच पठार भागात प्रत्येक गावात नुकसान भरपाई व पंचनाम्यात महसूल विभाग आणि कृषी विभाग भेदभाव झालेला आहे. ज्यांची खरोखर नुकसान झाली आहे त्यांनाच वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून पठार भागातील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले.
महसूल सप्ताहात माध्यमांचे प्रतिनिधी महसूल विभागाच्या विरोधात काही भूमिका मांडतात का ? कारण त्यांनाच याबाबत अनेक गोष्टी माहिती असतात. तसेच सामान्य शेतकऱ्यांना आपण काय करतोय ते लक्षात आणून द्यायचे नव्हते. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले गेले नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.