
रेल्वे मार्ग बदलास तीव्र विरोध, कृती समिती आक्रमक!
युवावार्ता (प्रतिनिधी)
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी प्रस्तावित नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-चाकण-पुणे हा सरळमार्ग सोडून शिर्डी-अहिल्यानगर मार्गे हा प्रकल्प नेण्याचा प्रयत्न सुरू असून, या बदलाला तीव्र विरोध होत आहे. या निर्णयामुळे रेल्वेचे अंतर 70-80 किमीने वाढून दीड तास अतिरिक्त वेळ लागणार असल्याने प्रकल्पाचा मूळ उद्देशच अपूर्ण राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा सरळमार्गेच व्हावा, अशी ठाम भूमिका मांडली आहे. वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करता आणि पुणे-नाशिक-मुंबई सुवर्ण त्रिकोणाचा औद्योगिक विकास डोळ्यासमोर ठेवता हा प्रकल्प सरळमार्गानेच होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70-80 किमी आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास दीड तास जास्त आहे. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास सेमी हायस्पीड हा मूळ उद्देशच फोल ठरेल. पुणे – नाशिक – मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणे गरजेचे आहे.
जीएमआरटीमुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे.पुणे – नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगीकरण व शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. पुणे – अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाही, मात्र ती पुणे – नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नाही. असे आ. सत्यजीत तांबे यांनी म्हंटले आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.