अकोले (प्रतिनिधी)
कोल्हार घोटी राज्यमार्ग रस्त्याच्या कडेला चालु असेलेल्या गटारींचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालु आहे. या गटारींना कुठलाही ढाळ देण्यात आलेला नाही. निव्वळ रस्त्याचे खोदकाम करून ठेवायचे व वाटेल तेव्हा वेळ काढून त्या कामाला मुहूर्त लावायचा असा प्रकार येथील ठेकेदारांचा चालु आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असणार्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीसोबत त्रासाला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे काम तातडीने पुर्ण करावी अशी मागणी परिसरातील व्यवासयीक व ग्रामस्थांनी केली आहे.
या गटारींचे काम निविदेप्रमाणे होत नाही. राज्य मार्ग रस्त्याचे रुंदीप्रमाणे रस्त्याची रुंदी एक सारखी दिसत नाही. त्यामुळे गटारींची हद्द चुकली आहे. रस्त्याच्या लगतच्या साईडपट्ट्या या अधिकार्यांच्या मनमानी पद्धतीने टाकण्यात आल्या आहेत. गटारींच्या बाजूला असणार्या धनदांडग्या लोकांच्या, दुकानदारांच्या मर्जीप्रमाणे वशिलेबाजी करून अनेक इमारती दुकानदारांच्या सोयीनुसार वाचवण्यात आल्या आहे. या गटारीचे बांधकाम व त्यात वापरले जाणारे मटेरियल अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. येणार्या पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे नवीन तयार केलेला रस्ता हा लवकरच खचून जाणार आहे.
चालु असलेल्या गटारींचे काम करणार्या ठेकेदारला प्रशासनाने कामाचे पेमेंट अदा करू नये. तसेच या ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत टाकावे. निकृष्ट काम करणार्या ठेकेदारांना पाठीशी घालणार्या भ्रष्ट अधिकारी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी दलितमित्र प्रकाश साळवे यांनी केली आहे.