अज्ञात वाहन चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे – भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने एका दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला तर पाठीमागे बसलेल्या वृद्ध इसमाला गंभीर मार लागला होता. या इसमावर सुरुवातीला येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये व नंतर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हा अपघात 15 एप्रिल रोजी शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील देना बँकेसमोर रात्री दहाच्या सुमारास घडला होता. या अपघातानंतर अज्ञात चार चाकी वाहन चालक पसार झाला होता. काल रविवारी या अज्ञात वाहन चालकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमा लक्ष्मण पवार वय 74 रा. संजय गांधी नगर, संगमनेर असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री फिर्यादी शशिकांत भानुदास शिंदे रा. ढोलेवाडी व मयत चिमा लक्ष्मण पवार हे दोघे त्यांच्या मोटरसायकल क्रमांक एम एच 17 डी ए 16 28 वरून जात असताना देना बँकेसमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
यात फिर्यादी किरकोळ जखमी झाले मात्र पाठीमागे बसलेले चिमा पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.