
उद्योजक, कर्मचारी आणि नागरिकांनी संकलित केल्या 428 बॅगा
अबकी बार 400 पार’ – संगमनेरकरांचा रक्तदानात नवा विक्रम
पाच ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी कार्यात संगमनेर तालुक्याने पुन्हा एकदा एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. LTC संगमनेर (टिचिंग लर्निंग कम्युनिटी) या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 428 बॅगांचे संकलन होऊन एक नवा इतिहास रचण्यात आला. या उपक्रमाचे घोषवाक्य ठरले – अबकी बार 400 पार ! आणि संगमनेरकरांनी ते साकार करत रक्तदातृत्वाचे उज्ज्वल उदाहरण घडवले.
रक्तदान म्हणजे केवळ रक्त देणे नव्हे, तर ते कोणाच्यातरी जीवनाची आशा बनवणे असते. अॅनेमिया, थॅलेसेमिया, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी लागणारे रक्त, डेंग्यूसारख्या आजारांतील प्लेटलेट्स यासाठी हे रक्त अत्यंत मौल्यवान ठरते. रक्त हे प्रयोगशाळेत न बनणारे एकमेव औषध आहे आणि ते फक्त माणसाकडूनच मिळू शकते. या पार्श्वभूमीवर, LTC संगमनेरने एकाच दिवशी संगमनेर तालुक्यात पाच ठिकाणी समांतरपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते:

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, गणपती मंदिरासमोर, गुंजाळवाडी. काऊ केअर फार्मास्यूटीकल प्रा. लि., चिखली. विनय क्लिनिक, कळस बुद्रुक, अकोले. प्रथम एनर्जी, राजापूर रोड, ढोले लॉन्सजवळ. सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, पिंपरने रोड, संगमनेर खुर्द.
या शिबिरांमध्ये स्थानिक उद्योजक, त्यांच्या कंपन्यांतील ब्लू कॉलर व व्हाईट कॉलर कर्मचारी, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदानाच्या या सामूहिक उत्सवात एकूण 428 बँग संकलित झाल्या. या यशस्वी उपक्रमासाठी ढङउ संगमनेरच्या सर्व सदस्यांनी सातत्याने केलेली मेहनत आणि सर्व रक्तदात्यांचे योगदान यामुळे हा ऐतिहासिक क्षण शक्य झाला. आजच्या धावपळीच्या युगात कुणालाही वेळ देणे कठीण झाले असताना, आपले अमूल्य रक्त कोणाच्यातरी जीवनासाठी देणे ही समाजासाठी मोठी सेवा आहे. LTC संगमनेरतर्फे सर्व रक्तदात्यांचे, सहभागी संस्थांचे, डॉक्टरांचे आणि स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले.





















