व्हिडिओ सोशल माध्यमावर आल्याने वादाला वेगळे वळण
युवावार्ता प्रतिनिधी)
संगमनेर –
– शहराजवळील सुकेवाडी हद्दीत असणार्या एका शेत जमीनीवरुन दोन भावात वाद आहेत. सदर जमीन लहान भावाने परस्पर मोठ्या भावाला बाजूला करून कागदपत्रांवर खोट्या सह्या करून जमीन आपल्या नावावर केली. त्यानंतर ही जमीन विक्रीचा घाट घातला. परंतु मोठ्या भावाने याला न्यायालयात आक्षेप घेतल्याने या व्यवहारात न्यायालय व प्रांताधिकारी यांनी स्थगिती दिली. असे असताना देखील शहरातील एक नगरसेवक ही वादातील जमीन खरेदीसाठी पुढे आला असता व त्याला सदर मोठ्या भावाने विरोध केला असता या नगरसेवकांने आपला रुबाब दाखवत त्यालाच दमबाजी करत या व्यवहारातून बाजूला हो नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. मात्र याचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या वादाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने या नगरसेवकाबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार अजिंक्य राजेंद्र जोर्वेकर यांची संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी हद्दीत गट नंबर 159/15/1 मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. दरम्यान तक्रारदार यांचे लहान भाऊ आदित्य जोर्वेकर याने कोर्टात खोटा दावा दाखल करून 12/11/2022 रोजी लोक न्यायालयात मोठ्या भावा ऐवजी दुसर्याच व्यक्तीला कोर्टासमोर उभे करुन खोट्या सह्या करून सदर मिळकतीमधून मोठ्या भावाला बेदखल केले. या खोटेपणाविरुद्द अजिंक्य जोर्वेकर यांनी न्यायालयात दाद मागितली असून फौजदारी कारवाई देखील केली आहे. याकामी ज्या वकिलाने खोटे कागदपत्रे तयार केली आहे त्याच्यावर देखील कारवाई होण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान वडिलोपार्जीत जमिन असून देखील आई व भावाने मिळून तक्रार दाराला या जमिनीतून बेदखल केले. तसेच परस्पर या जमिनीच्या विक्रीचा घाट घातला गेला. सध्या या जमिनीच्या खरेदी विक्रीला प्रतिबंध असतांना देखील अनेक मोठ-मोठ्या बिल्डरांनी ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांनी या व्यवहारातून माघार घेतली. त्यामुळे या लहान भावाने थेट आता या जमिनीच्या विक्रीसाठी गुंडांची मध्यस्थिती घातली आहे. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी संगमनेर नगरपालीकेतील एक नगरसेवक व त्याच्या साथीदाराने या वादग्रस्त जमिनीत येऊन ही जमिन खेरदी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांना अटकाव केला असता त्यांनी उलटपक्षी तक्रारदाराला मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच ही जमिन आम्ही खरेदी करू तुला काय करायचे, कुणाकडे जायचे बिनधास्त जा आम्ही कुणाला घाबरत नाही अशी धमकी दिली. याबाबतचा व्हिडीओ तक्रार दाराने सोशल मिडीयावर प्रसारीत केल्याने या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दोन भावांचा वाद असतांना, जमिन वादग्रस्त असतांना व तीच्या खरेदी विक्रीला परवानगी नसतांना सदर नगरसेवक आपल्या साथीदारांमार्फत तक्रारदारावर दबाव आणतो तसोच मारहाणीची धमकी देतो. हे निषेधार्य आहे. सध्या वेगवेगळ्या घटणांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ कारणावरून सामाजिक ऐक्य धोक्यात येत असतांना आशा जमिनीच्या वादात आर्थिक लाभासाठी गुंडगिरी करणे व धमकवणे. त्यातच कायदा न जुमाणने यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या नगरसेवकाचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या माहितीखाली प्रसारीत होत असल्याने व त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याने पोलीस प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. या प्रकरणी तक्रारदार अजिंक्य जोर्वेकर यांनी देखील आपल्या जीविताला धोका असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.