प्रभाग ५ मधील प्रत्येक घरात दिली भेट, धनुष्यबाणाला मतदान करण्याचे केले आवाहन

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर नगरपरिषद निवडणुकीने आता जोर पकडला असून अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ज्या उमेदवारांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांनी जोरात कंबर कसून प्रभागात प्रत्यक्ष गाठीभेटींवर जोर दिला आहे. प्रभाग क्र. ५ ब च्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एककीकडे नगराध्यक्षपदाचा मोठा अनुभव असलेले विश्वास मुर्तडक तर दुसरीकडे तरूणांची विशेष फळी असलेले युवा नेतृत्व रविंद्र म्हस्के. शिवसेनेकडून ५ (अ) मधून उमेदवार संगिता भारत गवळी यांच्यासाठी सुध्दा आमदार अमोल खताळ यांनी विशेष प्रचार केला. संगिता गवळी यांच्या विरोधात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या अनुराधा निलेश सातपुते या उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत.

रविंद्र म्हस्के यांच्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी विशेष जोर लावला असून उमेदवारी जाहिर होण्याच्या आधी आणि आता उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुध्दा प्रभाग ५ मधील भेटींमध्ये स्वत: खताळ फिल्डवर उतरताना दिसले. बुधवारी सकाळीच आमदार अमोल खताळ यांनी प्रभाग ५ मधील चैतन्यनगर, मार्केट यार्ड, अकोले बायपास, नाशिक-पुणे हायवे, जनतानगर असा परिसर पिंजून काढला.
रविंद्र म्हस्के यांच्या उमेदवारीसाठी स्वत: आमदारांनी कंबर कसल्याने कार्यकर्त्यांनाही मोठा उत्साह आला असून म्हस्के यांचे कार्यकर्ते घराघरात जाऊन पोहोचले आहेत.






















