
स्थानिक मागण्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जातील – तहसीलदार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आली होती. शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. दिल्लीच्या सीमेवर हमीभावाचा कायदा करावा या मागणीसाठी आंदोलन करणार्या शेतकर्यांवर केंद्र सरकारच्या वतीने दडपशाही करण्यात येत आहे. शेतकर्यांवर रबरी गोळ्या अश्रूधूर व लाठीचार्ज करून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. शेतकर्यांवर होत असलेल्या या अत्याचाराचा आणि अन्यायाचा धिक्कार देशभरात शेतकरी व कामगार रस्त्यावर उतरून करत आहेत. केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांचा अधिक अंत पाहू नये, शेतीचे संकट दूर करण्यासाठी, शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठी, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना संरक्षण मिळेल यासाठी शेतकरी केंद्री उपाययोजना कराव्यात, कामगारांवर होत असलेल्या अन्यायापासून त्यांना संरक्षण देणार्या उपायोजना करून कामगार व कर्मचार्यांना किमान वेतनाची हमी देणार्या उपायोजना कराव्यात अशी मागणी संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने करत आहोत. संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कर्मचारी समितीच्या वतीने देण्यात आलेल्या हाकेनुसार अकोले येथे किसान सभा व सिटू कामगार संघटनेच्यावतीने जबरदस्त मोर्चा काढण्यात आला. कॉ. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, वैशाली सुरसे, राजाराम गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, आहार कर्मचारी, आशा सेविका सहभागी झाले. भंडारदरा धरण अंतर्गत सर्वेक्षण करून बुडीत बंधारे बांधा, हिरड्याच्या झाडांची नोंद सातबार्यावर करा, घराच्या तळाच्या जमिनी घर मालकाच्या नावे करा, दारिद्र्यरेषेचे पुन्हा सर्वेक्षण करून गरिबांचा समावेश दारिद्र्यरेषेच्या यादीत करा, आदी स्थानिक मागण्याही यावेळी करण्यात आल्या. तहसीलदार साहेबांना यावेळी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक मागण्यांवर तातडीने उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन तहसीलदार अकोले यांनी मोर्चेला दिले.