तहसीलवरून आश्वीत आनंद, पठारात संताप

0
75

सोशल मीडियावर रंगला सामना

प्रस्तावाची ठिकठिकाणी होळी सुरू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक या ठिकाणी अपर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्याने आश्‍वी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे तर ज्यांना खरी गरज होती त्या पठार भागात मात्र संतापाची मोठी लाट उसळली आहे. तर घेण्यात येणारा निर्णय कसा योग्य आहे, आपला नेता किती चांगले काम करतो यावर सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चा रंगत आहे. त्याचबरोबर काहींचा संबंध नसताना व कोणतीही मागणी नसताना पाच दहा किलोमीटर अंतर सोडून वीस पंचवीस किलोमीटर तुडवला लागणार असल्याने शहरालगतच्या गावांनी या प्रस्तावाची ठिकठिकाणी होळी सुरू केली आहे.
संगमनेर तालुक्याचा पूर्वभागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आश्‍वी परिसरात व्यापारास पूरक औद्योगिक वसाहत, कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय कार्यालय नसल्याने परिसरातील गावांमधील ग्राहकांनी आश्‍वी बाजारपेठेकडे पाठ फिरवली. आता आश्‍वी बुद्रूक येथे अपर तहसील कार्यालय सुरू झाल्यास
येथील व्यापारीपेठेला नवसंजीवनी मिळणार असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे. तर राजकीय हेतू बाजूला ठेवून गैरसोय होत असलेली गावे वगळून आश्‍वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


दुसरीकडे आश्‍वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्तावाला पठार भागातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी एकत्र येत घारगाव येथे रविवारी बैठक घेतली. तालुक्यातील पठार भागातील गावे, तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर आहेत. घारगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करावे. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. तालुका मुख्यालयापासून पठार भागातील गावे दूर असताना पठार भागात कार्यालय निर्माण करण्याचा विचार करण्यात न आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या गावांतील ग्रामस्थांना महसूलच्या कामांसाठी 50 ते 60 किलोमीटर अंतरावर संगमनेर येथे जावे लागते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी यांचा पूर्ण दिवस वाया जातो. एका दिवसांत काम न झाल्यास हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, खासगी एजंटांची मदत घ्यावी लागते. वेळ व पैसा वाया जात असल्याने सर्व गावांच्या अंतराचा विचार केला असता नवीन अप्पर तहसील कार्यालय निर्मितीसाठी नाशिक पुणे महामार्गावर असलेले घारगाव हे मध्यवर्ती ठिकाण योग्य आहे. येथेच हे कार्यालय व्हावे यासाठी विविध गावाचे ग्रामस्थ एकत्र आले आहेत.


या बैठकीत काँग्रेसचे अजय फटांगरे, घारगावचे सरपंच नितीन आहेर, आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, गणेश सुपेकर, अमित फटांगरे, मंगेश कान्होरे, गणेश धात्रक, दत्ता ढगे, रवींद्र पवार, संदीप सुपेकर, राम अरगडे, संतोष शेळके, सोमनाथ रोडे, राजवर्धन पिसाळ, भूषण शेळके, संपत मेढे, सुनंदा मेढे यांसह विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने होऊ घातलेल्या आश्‍वी बु अप्पर तहसील कार्यालयास तालुक्यातील खांडगाव अंभोरे, जाखुरी , कोळवाडे, नीमज , पिंपारणे,खराडी या गावांनी विशेष ग्रामसभा बोलून विरोध दर्शवला आहे. संगमनेर तालुक्याचे होणारे विभाजन हे तालुक्यातील जनतेला मान्य नसून अनेक गावे आता आक्रमक झाली आहे. पिपारणे येथे या नविन अध्यादेशाची होळी करण्यात आली आहे.
विस्ताराने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात विकास कामांमुळे एक विशेष लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र येथील अर्थव्यवस्था ही काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड सुरू असून शहरालगतची अनेक गावी अश्‍वी बु येथे होणार्‍या अप्पर तहसील कार्यालयात जोडली आहे. यामुळे अनेक गावे संतप्त झाली आहे. राजकीय उद्देशातून आश्‍वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करून त्यामध्ये संगमनेर शहरालगतची अनेक गावे जोडण्याचा सत्ताधार्‍यांनी घातलेला घाट अत्यंत चुकीचा आहे. हा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा मोठे जन आंदोलन उभारले जाईल असा इशाराही या गावांनी प्रशासनाला दिला आहे.
अपर तहसिल हा विषय सध्या संगमनेरात जोरदार चर्चेला जात आहे. सोशल मीडियावर राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते मात्र आपलाच नेता कसा योग्य या, कुणाची सोय होवो अथवा गैरसोय होवो यांना काहिही देणेघेणे नाही. फक्त एखाद्याला विरोध करायचा व आपल्या नेत्याला खुष ठेवायचे एव्हढाच हेतू ठेवून या चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here