विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज विधानभवनात झाले. यावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
संसदीय कार्य प्रणालीत महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून अनेक क्रांतिकारी कायदे या विधिमंडळात झाले आहेत. सदस्यांसह राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि राजकीय विचारवंत, तज्ञ, माध्यमे, सर्वसामान्य जनतेसाठी विधिमंडळ हे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा एक प्रचंड मोठा जनरेटर आहे, त्यामुळे विधिमंडळ आणि प्रशासनाविषयी जनमानसात आदर वाढविण्यासाठी या अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रक्रिया समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.