शुक्रवारी शरद पवार नगर जिल्ह्यात

0
1230

शक्तीप्रदर्शनाद्वारे लंके अर्ज भरणार

युवावार्ता (प्रतिनिधी) अहमदनगर

महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या संवाद यात्रेचा समारोप शुक्रवारी (दि.19) नगरमध्ये होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नगरमध्ये दिवसभर तळ ठोकून राहणार आहेत. गांधी मैदानात सायंकाळी जाहीर सभा होणार असून या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, माहितगार सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीलेश लंके हे मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी पंधरा दिवसांपूर्वी मोहटादेवी गडावरुन संवाद यात्रेस प्रारंभ केला होता. मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये ही संवाद यात्रा गेली. गावोगावी या यात्रेचे मोठे स्वागत करण्यात आले. याशिवाय गावोगावी मोठा प्रतिसाद देखील मिळाला. सध्या पारनेर तालुक्यात ही संवाद यात्रा आहे.

शुक्रवार, दि. 19 रोजी महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय नेते नगरमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचा समावेश असणार आहे. दि. 19 रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार हे सकाळी हेलीकॉप्टरने नगरमध्ये दाखल होतील. सकाळच्या सत्रात विविध संघटना आणि प्रमुख नेते यांच्याशी ते संवाद साधतील. यानंतर दुपारी चारच्या सुमारास माळीवाडा बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगर शहरातील संवाद यात्रेला मिरवणुकीने प्रारंभ होईल.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचा जो मार्ग नगर शहरात असतो त्याच मार्गाने नीलेश लंके यांची संवाद यात्रा जाणार आहे. संवाद यात्रेच्या अग्रभागी स्वत: शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आदी महाविकास आघाडीचे नेते असणार आहेत. गांधी मैदानात या यात्रेचा जाहीर सभेने समारोप होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here