ग्रामपंचायत सदस्याच्या घरातच अवैध दारू विक्री

0
1479

37 हजार 775 रुपयांचा अवैध दारूसाठा हस्तगत


युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले- दारूबंदी असलेल्या राजूर गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथकाने राजूर ते दिगंबर रस्त्यावरील एका घरात छापा टाकून 37 हजार 775 रुपयांचा अवैध दारूसाठा हस्तगत केला. या गुन्ह्यात राजूर येथील एक ग्रामपंचायत सदस्यच आरोपी असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत राजूर पोलिस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्यांसह चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात दोन महिलांसह दोन युवकांचा समावेश आहे.
राजूर गावात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती समजल्यावर संगमनेर व श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. राजूर ते दिगंबर रस्त्यावरील चंदनवाडी परिसरात राजूर ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया रोशन रोकडे यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत देशी मद्याच्या 8.1 लीटर्स व विदेशी मद्याच्या 26.86 लीटर, तसेच बिअर 32.5 लीटर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राजूर येथील ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया रोशन रोकडे यांच्यासह दीप्ती प्रतीक रोकडे, रोशन कैलास रोकडे, प्रतीक कैलास रोकडे अशा चार आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. दारू उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त सागर धोमकर, जिल्हा अधीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 चे निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक जी. एन. नायकोडी, नीलेश पालवे, सी. एस. रासकर, के. पी. ढावरे, के. के. शेख, एस. आर. वाघ आदींनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here