गहू-मसूर हमी भावात सर्वाधिक वाढ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – केंद्र सरकारने हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. यात राज्याचे महत्वाचे रब्बी पीक असलेल्या हरभर्याच्या हमीभावात 105 रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदाच्या रब्बीत हरभर्याला 5 हजार 440 रुपये हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव 150 रुपयांनी वाढवण्यात आला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.18) हंगाम 2024-25 च्या रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीला मान्यता दिला. रब्बी हंगामात हरभरा हे राज्याचे मुख्य पीक आहे. देशात कडधान्याचा पुरवठा कमी असल्याने मागील काही आठवड्यांपासून हरभर्याचा भाव वाढला. तसेच देशातील दुष्काळी स्थिती आणि कडधान्याचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात केंद्र सरकार हरभर्याच्या हमीभावात किती वाढ करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण सरकारने हमीभावात केवळ 105 रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदा हरभर्याचा हमीभाव 5 हजार 440 रुपयांवर पोचला.
मागील हंगामात हरभर्याला 5 हजार 335 रुपये हमीभाव होता.सरकारने गव्हाच्या हमीभातही 150 रुपयांची वाढ केली. गव्हाचा हमीभाव 2 हजार 275 रुपयांवर पोचला. मागील हंगामात गव्हाचा हमीभाव 2 हजार 125 रुपये होता. मोहरीच्या हमीभावात 200 रुपयांची वाढ करून 5 हजार 650 रुपये करण्यात आला. सूर्यफुलाच्या हमीभावात मात्र केवळ 150 रुपयांची वाढ करण्यात आली. यंदा सूर्यफुलाला 5 हजार 800 रुपयांचा आधार मिळेल.मसूरला सर्वाधिक वाढ
केंद्र सरकारने हरभरा उत्पादकांची काहिशी नाराजी केली असली तरी मसूर उत्पादकांना मात्र काहिसा दिलासा दिला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक 425 रुपये वाढ केली. मसूरचा हमीभाव आओता 6 हजार 425 रुपयांवर पोचला. मसूर हे काही प्रमाणात तुरीला पर्याय समजली जाते. देशात तुरीचा तुटवडा असून भाव वाढलेले आहेत. काही करूनही तुरीचे भाव कमी होत नसल्याने तुरीला पर्याय ठरू शकणार्या मसूरचे उत्पादन वाढविण्याचा सरकारचा उद्देश आहे. हमीभावात चांगली वाढ झाल्याने शेतकरी पेरा जास्त वाढवू शकतात. सरकारने खरेदीचीही हमी दिली आहे. पण देशात कमी पडलेला पाऊस आणि धरणांमधील कमी पाणीसाठी यामुळे उत्पादनवाढीवर मर्यादा येऊ शकतात. रब्बी हंगामातील हमीभाव जाहीर करताना पुन्हा एकदा सरकारने उत्पादन खर्चावर नफा दिल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यंदा गव्हाला उत्पादन खर्चावर 102 टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला. कारण गव्हाचा उत्पादन खर्च 1128 रुपये असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे. तर हरभर्याचा उत्पादन खर्च 3 हजार 400 रुपये असून त्यावर 60 टक्के नफा गृहीत धरून 5 हजार 440 रुपये हमीभाव जाहीर केला. तसेच मोहरीला 98 टक्के, मसूरला 89 टक्के, बार्लीला 60 टक्के आणि सूर्यफुलाला 52 टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला असल्याचे केंद्राने म्हटले आहे.