निमगाव बु. वसुंधरा योजनेसह विकास कामांचे पैसे परस्पर लाटले
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील निमगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकार्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना अंधारात ठेवून तब्बल 34 लाख रुपयांचा अपहार केला. याबाबत सरपंच व सदस्यांनीच तक्रार केल्यानंतर अखेर गटविकास अधिकार्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर विस्तार अधिकारी यांनी मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी चौकशी करून कागदपत्रे ताब्यात घेतले. या प्रकारामुळे निमगाव बुद्रुकसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्या निमगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांने मनमानी पद्धतीने कारभार केला. गावात 14 व्या वित्त आयोगाच्या नावाखाली सतरा लाख रूपयांचे काम करण्यात आले. मात्र या कामासाठी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. सरपंच व ग्रामपंचायतला विश्वासात न घेता परस्पर काम करुन ठेकेदाराला पैसे देण्यात आले. तसेच गावाला तीस लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या बक्षिसातील देखील 17 लाख रुपये याच कामासाठी परस्पर देण्यात आले. एक तर सदर कामास कोणतीही प्रशासकीय मंजुरी नव्हती, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही, कामही हलक्या दर्जाचे करण्यात आले. तसेच एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून 17, 17 लाख असे सुमारे 34 लाख रुपये लाटण्यात आले. याबद्दल सरपंच यांना भनक लागल्यावर त्यांनी ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता सरपंचांनाच काही लाखाचे अमिष दाखविण्यात आले. मात्र त्यांनी त्यास नकार देत याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार सदर ग्रामसेवकाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.