कामाप्रती असणाऱ्या नितांत श्रद्धेचे उत्तम उदाहरण म्हणजे डाॅ. कुटे – सुनील गायकवाड
पांडुरंग, विठ्ठल कुठे शोधायची गरज नाही. कारण माणसातला देव पहाणारे डॉक्टर म्हणजे डॉ.प्रदिपजी कुटे साहेब. याचे कारण म्हणजे शिर्डी येथील काशीकानंदगिरी महाराज यांच्या पायी दिंडीमध्ये आमचे वडील भाऊसाहेब दशरथ गायकवाड व शिर्डी परिसरातील वारकरी शिर्डी ते आळंदी या पायी दिंडीसाठी जात होते. यावेळी दिनांक 3 /12 /2023 रोजी घारगाव परिसरामध्ये संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान या दिंडीला भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगाने जाणार्या कंटेनरने दिंडीतील पायी जाणार्या वारकर्यांना उडवले आणि त्यामध्ये काही वारकर्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही वारकरी अत्यंत गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतील वारकर्यांना संगमनेर येथील कुटे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यात जवळपास सात ते आठ वारकर्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. आमदार बाळासाहेब थोरात, मा. शालिनीताई विखे यांनी येऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. कुटे हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीपजी कुटे सर, डॉ. सोनाली कुटे मॅडम तसेच सर्व डॉक्टर, नर्स व स्टाफ यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करून वारकर्यांना तातडीची सेवा सुरू केली. नाजूक परिस्थिती असलेल्या सर्व वारकर्यांमधून एकही वारकर्याला काही होऊ न देता सर्वांना नाजूक परिस्थितीतून एक ते दोन दिवसात सर्वांना बाहेर काढले. अक्षरश: काही पेशंटचे नातेवाईक हजर नसतानाही येथील स्टाफने घरच्या माणसापेक्षाही जास्त काळजी या वारकरी रुग्णांची घेतली. आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व वारकरी रुग्णांना भेटून सर्व उपचाराची जबाबदारी स्वतः घेतली.
रूग्णांची हलचाल वेळोवेळी जाणून घेत डॉक्टरांना आवश्यक त्या सुचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. रूग्णांच्या उपचारात कोणतीही कसर राहाता कामा नये याकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली. डॉक्टर प्रदीप कुटे, डॉ. सोनाली कुटे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफनी सर्व वारकरी रुग्णांची आपल्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेतलेली काळजी मी प्रत्यक्ष बघत होतो. सात ते आठ दिवसानंतर सहा ते सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आमचे वडील व इतर एक पेशंटचे शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान अजूनही एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की येथे येणार्या प्रत्येक रुग्णांची सेवा हॉस्पिटलमध्ये सर्व स्टाफ खूप चांगल्या प्रकारे करतात. आमचे वडील व ऑपरेशन झालेले पेशंट कमीत कमी दोन महिने जागेवरून उठणार नाही असे आम्हाला वाटायचे, परंतु ऑपरेशन झाल्यानंतर सात ते आठ दिवसात दोन्हीही पेशंट अक्षरशा चालायला लागले. या बद्दल डॉ. कुटे व त्यांच्या परिवाराचे आम्ही किती आभार मानले तरी कमीच पडतील. डॉक्टर प्रदीपजी कुटे सर व स्टाफच्या ऋणातून आम्ही कधीही उतराई होऊ शकणार नाही. आमचे वडीलांनी व्यक्त केलेल्या इच्छे नुसार आम्ही डॉक्टरांचा छोटासा सत्कार करुन त्यांचे आभार मानले. आमचे वर्गमित्र व हॉस्पिटलचे मॅनेजर जवळके येथील अण्णा पाटील थोरात, प्रदिप मेडिकलचे संचालक सुनिल गागरे यांचेही खूप मोठे योगदान लाभले. एकूणच कुटे हॉस्पिटलमध्ये रूग्णांची होणारी सेवा व घेतली जाणारी काळजी यातून डॉ. कुटे यांचे आपल्या कामाप्रती असलेली श्रद्धा दिसून येते.
- सुनील गायकवाड
वेस, ता. कोपरगाव