समाजहिताचे अनेक उपक्रम एकत्र करण्याचे धोरण
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – परदेशी पाहुणे तालुक्यातील एका खेडे गावात येतात, तेथे उभारलेली शिक्षण संस्था, शिक्षण व्यवस्था पहातात आणि आश्चर्य चकीत होऊन अगदी मनसोक्त तेथील मुलांसोबत डान्स करतात. हे ऐकून तुमच्याही कानावर विश्वास बसणार नाही. पण युरोप आणि अमेरिकेतल्या सामाजिक कार्यकर्त्यांना संगमनेरमधल्या एका खेडेगावात म्हणजेच पारेगावात फिरताना असं काही दिसलं ते पाहून त्यांच्याही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. हायस्पीड इंटरनेट, 24 तास लाईट आणि परदेशात वापरली जाणारी सॉफ्टवेअर तयार करणारे शेतकर्यांची पोरं.. हे एक वेगळंच विश्व पाहून परदेशी पाहुणे थक्कच झाले नाही तर भारावून गेले.
सीआयएफ उपक्रमांतर्गत स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंडचे सामाजिक कार्यकर्ते भारतात आले होते. त्यांना माहिती मिळाल्यानंतर संगमनेरमधील पारेगावात उभी राहिलेली बाप कंपनी पाहिली आणि एका गावातही असं काही होऊ शकते यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.
इथे येऊन त्यांनी भारतातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या रूढी परंपरा देखील जाणून घेतल्या. योगायोगाने गावची जत्रा असल्याने अगदी बैलगाडा शर्यत ते तमाशातील हजेर्यांचा देखील मनमुराद आनंद लुटला. भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू दाखविणार्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन यावेळी बाप कंपनीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या विदेशी पाहुण्यांनी मराठी गाण्यांवर ठेका धरला. यापूर्वी देखील अमेरिकेच्या पाहुण्यांनी बाप कंपनीला भेट दिली आणि कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी या ठिकाणी जे विश्व निर्माण केले. त्याबद्दल त्यांना दाद दिली. जिथे शेतकर्यांच्या पोरांना नोकरी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत, जिथे शेतकर्यांच्या पोरांना नोकरी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत, तिथेच बाप कंपनीने शेतकर्यांच्या पोरांना इंजिनीअर होऊन, गावखेड्यात राहून नोकरी करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आलेल्या विदेशी पाहुण्यांचे काम आणि कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांचे व्हीजन यात त्यांना साम्य दिसून आले. समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा हाच दोघांचाही प्रयत्न असल्याने ही एकजूट होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे या दोन्ही संस्थांमध्ये समाजहिताचे अनेक उपक्रम एकत्र करण्याचे धोरण ठरविण्यात आले.
यावेळी परदेशी पाहुण्यांनी बोलताना हा एक उत्तम आणि तितकाच आश्चर्यकारक अनुभव असल्याचे सांगत येथील विद्यार्थ्यांना व बाप कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.