विद्यार्थीनीच्या वहीत गृहपाठाऐवजी तोडल्या अश्लीलतेच्या मर्यादा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एका शिक्षकाने आपल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासत चक्क आपल्याच विद्यार्थीनींसोबत अश्लिल वर्तन केले. विद्यार्थिनींना प्रचंड अश्लील शब्दांचे प्रेमपत्र लिहून लग्न आणि शरिरिक संबंधांची मागणी केली. या वासनांध शिक्षकाने गृहपाठाची वहीच आपल्या वासनेसाठी वापरली. या शिक्षकाचा प्रताप हळूहळू शाळेतील इतर शिक्षकांना माहीत झाला आणि एके दिवशी ही वही शाळेतील काही शिक्षकांच्या हाती लागली आणि या घटनेवर प्रकाश पडला. त्यानंतर या शिक्षकाची चौकशी झाली आणि संबंधित शिक्षक दोषी आढळला. त्यांनतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या शिक्षकाला निलंबित केले. हा प्रताप करणारा शिक्षक अपंग असून तो संगमनेर तालुक्यातील एका शाळेत कार्यरत होता. गणपत जानकू सुकटे असे या निलंबित शिक्षकाचे नाव आहे. निलंबनानंतर त्यास जामखेड हे मुख्यालय देण्यात आले आहे. मात्र, त्याचे निलंबन नको तर त्याला बडतर्फ करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता पालक आणि शैक्षणिक क्षेत्रातून केली जात आहे.
गणपत सुकटे अकोले तालुक्यातील रहिवासी असून तेथेच तो कार्यरत होता. मात्र, तेथे देखील तो वादाच्या भोवर्या सापडला होता, त्यानंतर तो संगमनेर तालुक्यातील खंडगाव येथे आला. येथे आल्यानंतर त्याने सुरवातीला सर्वांच्या नजरेत भरेल असे चांगले काम केले आणि पालकांची सहानुभूती मिळविल्यानंतर त्याने आपले विकृत उद्योग सुरू केल सुकटे याने त्याच्याच वर्गातील मुलीशी विकृत चाळे सुरु केले. गृहपाठाच्या वहीत त्याने शेरो-शायरी, चोरोळ्या आणि कविता करुन संबंधित विद्यार्थीनिस मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. सदर मुलगी देखील त्याच्या या प्रकाराला बळी पडली. एकाच वहीत हे दोघे एकमेकांसाठी चिठ्ठ्या लिहू लागले. त्यात प्रेमापेक्षा अश्लीलता प्रचंड भरलेली होती. आपण शिक्षक आहोत याचे भान विसरून हा सुकटे शाळेत वावरत होता. आणि ही बात इतर विद्यार्थी व शिक्षकांच्या नजरेतून सुटली नाही. आणि एकेदिवशी त्याच्या करामतीचा पाढा वाचणारी ती वही सहशिक्षकांच्या हाती लागली, त्यांनी ती वरिष्ठ अधिकार्यांकडे जमा केली. त्यातील मजकूर वाचून अधिकार्यांना घाम फुटला. तात्काळ याची दखल घेत अधिकार्यांच्या मार्फत चौकशी नेमण्यात आली.
या चौकशीत विद्यार्थीनीला अश्लिल संदेश पाठवेणे, अश्लिल भेटकार्ड देणे, वर्गात धोकादायक हत्यार बाळगणे, पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, त्यांना धमकावणे, शालेय वेळात मोबाईलवर गेम खेळणे अशा प्रकारे अनेक गैरवर्तन या सुकटेने केल्याचे आढळून आले. याप्रकरणी त्याच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून घडत होते. मात्र गाव आणि शाळेची बदनामी होऊ नये म्हणून अनेकजण शांत होते. मात्र आज अखेर हे कृत्य बाहेर आले.