![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/05/thorat-E-news-1024x466.jpg)
सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संपूर्ण महाराष्ट्रभर उष्णतेबरोबर निवडणुकीचे वातावरण ही तापले आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराची धामधूम सुरू असून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना सर्व लोकसभा मतदारसंघातून मोठी मागणी असून त्यांनी प्रचाराचा झंझावात कायम ठेवला असून त्यांच्या सभांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसर्या टप्प्यात पश्चिम विदर्भात निवडणुका झाल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या सभा घेतल्या. त्या पाठोपाठ अमरावती, नांदेड, हिंगोली येथेही भव्य सभा झाल्या. काँग्रेस नेते खा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर विविध बैठकांसह अनेक सभा मधून त्यांनी जनतेला मार्गदर्शन केले आहे. तर राज्य पातळीवर सातत्याने ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा.संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत प्रचार सभांचा धडाका सुरू आहे.
उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारसह अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातही आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या सभा घेतल्या. नाशिक, धुळे, जुन्नर, सासवड, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणीही प्रचार सभांचा धडाका कायम ठेवला आहे.
महाराष्ट्रातील फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला मान्य नसून काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार असणारे आमदार थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, रोजगार हमी असे अनेक महत्त्वपूर्ण खाते अत्यंत कार्यक्षमपने सांभाळले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद व राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि हिमाचल व गुजरातचे निरीक्षक पद ही सांभाळले आहे.
अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी गावोगावी प्रचाराचे नियोजन केले असून या दोन्ही मतदारसंघासह राज्यभरातून महाविकास आघाडीला 40 जागा तर देशपातळीवर एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त करताना देशात भाजपा विरोधी व महाराष्ट्रात महायुती विरोधी मोठी लाट निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मोठी जबाबदारी असल्याने आ. थोरात हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. आपल्या कार्यकर्त्यांनाही हेलिकॉप्टर प्रवास घडावा यासाठी त्यांनी संगमनेरच्या दोन युवा पदाधिकार्यांना घेऊन संगमनेर ते धुले असा प्रवास केला. मतदार आणि कार्यकर्ते सांभाळणारे थोरात या निवडणूकीत प्रचंड मेहनत घेतांना दिसत आहे.
![](http://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/04/Swami-1-1024x985.jpg)