चव्हाणांना राज्यसभा व केंद्रात मंत्रीपदाची ऑफर
15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश
सोबत काँग्रेसचे अनेक आमदार
मला खूप काही बोलायचय पण बोलणार नाही – सत्यजित तांबे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांची नाराजी
मुंबई (वृत्तसंस्था)
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असतांना महाराष्ट्रात आज सोमवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आज काँग्रेसमध्ये मोठी फुट पडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा तसेच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या सोबत काँग्रेसचे 13 -15 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. तर यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत या सर्व फुटीमागे आपणच असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या सोबत आणखी आमदार राजीनामा देणार असल्याने पक्षात होणार्या या संभाव्य भूकंपाची माहिती देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौर्यावर जाणार आहेत. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत भाजपात जाणार्या काही नेत्यांमुळे राज्यात किती फरक पडणार, राजकीय स्थिती काय असेल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू होत्या. स्वतः चव्हाण यांनी याचे अनेकदा खंडण केले होते. भाजपच्या एका बैठकीत बावनकुळे यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते. भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाविषयी जाहीर वक्तव्य केले होते.
अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोट्याळाचा मोठा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांच्या साखर कारखान्याच्या देखील चौकशी लागल्या आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत मागील काही दिवसांपासून त्यांचे बिनसलेले संबंध यामुळे चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान चव्हाण यांच्यावर भाजपानेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजपामध्ये प्रवेश करणार्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने आता हेच नेते भाजपामध्ये जाऊन पवित्र होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.