डॉ. आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, परभणी,बीड घटनेबद्दल संगमनेरात काँग्रेसचे निषेध आंदोलन

0
597

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची. भाजपची ही नीती असून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित भव्य निषेध आंदोलनात ते बोलत होते. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे अमर कतारी, रिपाईचे बाळासाहेब गायकवाड, प्रा. हिरालाल पगडाल, यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी व विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे निषेध आंदोलन करण्यात आले.


यावेळी माजी मंत्री श्री. थोरात म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्थ असून हे एका व्यक्तीचे वक्तव्य नसून ही भाजपची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो आहे. भाजपची महाराजांवर कधीही श्रद्धा नव्हती. या घटनेतील भ्रष्टाचाराची चौकशी नाही. मणिपूरमधील आदिवासी भगिनींवर अत्याचार झाले त्याबद्दल पंतप्रधान महोदयांनी एक शब्दही निषेध व्यक्त केला नाही.
परभणीमध्ये दलित कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू होतो. त्याची खरी चौकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे बीडमधील सरपंचाची हत्या करण्यात आली. यामागे कोण आहे. खरे आरोपी शोधले पाहिजे, या आरोपींना संरक्षण मिळते की काय अशी शंका आता निर्माण होत आहे. आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे. आंदोलन केले म्हणून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला होतो. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास संसदेमध्ये जाण्यापासून खा. राहुल गांधी व इतरांना रोखले जाते. आणि डॉ आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याच्या घटनेवरून प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काहीतरी खोटी घटना दाखवून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात हा काय न्याय आहे.?
देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. हे सर्व जपण्यासाठी आपल्या सर्वांना लढावे लागणार आहे. संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करू या.
डॉ. तांबे म्हणाले देशभरामध्ये अस्थिरता वाढते आहे. जातीभेद निर्माण केला जात आहे. झालेल्या घटना या अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना निर्माण करून ते राज्यघटना बदलण्याची पायाभरणी करत आहेत. आपण अशा घटना विसरून गेलो तर सर्वांना मोठा पश्‍चाताप होणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here