उद्योजक आणि व्यापार्यांशी मनमुराद गप्पा; उलगडले मनातील किस्से
आ. बाळासाहेब थोरात हे आमचेकुटुंबप्रमुख – डॉ. संजय मालपाणी
आमदार बाळासाहेब थोरात यांनी कधीही भेदभाव केला नाही. शहरात चांगले वातावरण रहावे . यासाठी सातत्याने काम केले असून कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक संगमनेरकरांना त्यांचा अभिमान आहे . ते आमच्यासाठी पक्ष किंवा राजकारण नसून संपूर्ण संगमनेरकरांची भावना असल्याचे गौरवउद्गार डॉ. संजय मालपाणी यांनी काढले आहे
संगमनेरमध्ये मुद्दाम अशांतता पसरवली जातेयतरूण पिढीला भरकटवले जातेय – आ. थोरात
नवीन नगर रोडवरील साधूंना मारहाण झाली असे म्हटल्यानंतर चुकीच्या बातम्या पसरविल्या. मुळात साधू कुठून आले आणि त्यांना मारणारे कोण? ते कोणत्या जातीचे? याचा खरा उहापोह झाला पाहिजे. मी गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणूनच बघतो. तो कोणत्याही जात धर्माचा असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे असे माझे मत आहे. मात्र आजकालच्या तरूण पिढीला मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत याचे वाईट वाटत असल्याचे आ. थोरात म्हणाले.
संगमनेर (प्रतिनिधी) – आज चीन किंवा दुबईची तुलना जर केली तर त्यांची प्रगती ही आर्थिक सुबत्तेने झाली आहे. महाराष्ट्रात आणि भारतात मात्र जात-धर्मात दुफळी माजवून विकासाला खिळ लावली जात आहे. माझा विश्वास हा पसायदान आणि भारताच्या राज्यघटनेवर असून तोच राजकारणाचा सुध्दा पाया असल्याचे आ. बाळासाहेब थोरात यांनी मालपाणी लॉन्स येथे आयोजित केलेल्या व्यापारी संवाद कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ. सुधीर तांबे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, राजहंसचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, संगमनेर एमआयडीसीचे चेअरमन के.के. थोरात, निलेश जाजू, प्रकाश कलंत्री, कैलास सोमाणी, ओंकारनाथ भंडारी, सोमेश्वर दिवटे, सुभाष ताजणे, कल्पेश मेहता, राणीप्रसाद मुंदडा, श्रीनिवास भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या संवाद कार्यक्रमासाठी तालुक्यातील 500 हून अधिक व्यापारी, उद्योजक उपस्थित होते. उपस्थित व्यापार्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना आ. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघात वेळ न घालवता महाराष्ट्र बघावा अशी साद घातली. आम्ही 1 लाख पेक्षा जास्त मताधिक्यांनी आपल्याला निवडून आणू असे आश्वासन यावेळी दिले. प्रकाश कलंत्री, विवेक कासार, चेतन कर्डिले, के. के. थोरात, निलेश जाधव, विजय रहाणे, योगेश कासट, ओंकार भंडारी आदींची भाषणे झाली. डॉ. संजय मालपाणी यांनी थोरात साहेबांचे सहकार, शिक्षण, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे काम असून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे सांगितले. आ. थोरात यांनी आपल्या मनोगतातून संगमनेरच्या विकासासंबंधी चर्चा केली. येथील बँक आणि पतसंस्थांची उलाढाल 8500 कोटीच्या पुढे आहे. 7000 कोटीच्या पुढे कर्ज वाटप आहे. येथील सहकार आदर्शवत असून महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील मुले उच्च पदावर आहेत. येथील उद्योजक आता एक्स्पोर्ट मध्ये काम करत असून संगमनेरच्या उद्योजकांचा महाराष्ट्रात दबदबा आहे. येथील सहकारी संस्थांमुळे बाजारपेठ खुलली आहे. दिवाळीमध्ये संगमनेरमध्ये होणारी आर्थिक उलाढाल महाराष्ट्रात अव्वल आहे.
संगमनेरचे रस्ते, येथे असणारी निळवंडे पाईपलाईन आणि सर्वात महत्वाचे येथे असणारी शांतता-सुव्यवस्था माझ्या दृष्टीने महत्वाची आहे असे आ. थोरात म्हणाले. स्व. विलासराव देशमुख यांनी मी कृषीमंत्री असताना एका मीटींगमध्ये निळवंडे पाईपलाईनला परवानगी दिली. शिर्डी विमानतळाची जागा मी सुचवली. गेल्या 8 टर्ममध्ये मी काम केले पण त्या कामाचे भांडवल केले नाही. कृषीमंत्री किंवा महसूलमंत्री असताना संगमनेरमधील अनेक विरोधी पक्षाच्या व्यक्तींना शालेय संस्था काढण्याच्या परवानगी मी दिल्या. या मतदारसंघात नेहमीच शांततेचे, संयमाचे वातावरण मी तयार केले. आता मात्र काही खबरीलाल येथील वातावरण खराब करण्याचे काम करीत आहेत. शासनामध्ये काम करीत असताना ऑनलाईन सातबारा, पीककर्ज माफी, निळवंडे धरण, धरणाचे कालवे याप्रकारची अनेक कामे केली आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर सुध्दा मला काम करण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 20 जणांच्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून मी आहे याचे कारण म्हणजे एकनिष्ठा आणि संयम.
बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या विरोधकांच्या घोषवाक्यावर जोरदार हल्ला करत विकासाचा मुद्दा नसल्याने विरोधक केवळ भरकटवत आहेत. कांदा निर्यात, सोयाबीन भाव, गॅस आणि संसारपयोगी वस्तूंची भाववाढ, सरकारवरील कर्ज, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयांवर हे बोलू शकत नसल्याने मतदारांना भरकटवण्याचे काम करत आहेत असेही थोरात म्हणाले. विखेंवर टीका करताना आ. थोरात म्हणाले की विकासाच्या मुद्यावर मी कुठेही आणि केव्हाही चर्चा करायला तयार आहे पण इथे येवून दहशतीचे वातावरण करण्याचे काम विखेंनी केले आहे. येथील कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणे, आरएमसी प्लँट बंद करणे, वाळू वाहतुकीला मुद्दाम त्रास देणे, मुरूम वाहतुकीला त्रास देणे हे काम विखेंनी खबरीलालच्या माध्यमातून केले आहे. बेरजेचे राजकारण करताना सूडाचे राजकारण मी कधीही केले नाही असे आ. थोरात यांनी सांगितले.