अनधिकृत बस थांबा तयार करून परिवहन महामंडळ चे अधिकारी, कर्मचारी, बस चालक यांच्याकडून हफ्ते घेत लाखोचा भ्रष्टाचार
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात अनधिकृत बस थांबा तयार करून परिवहन महामंडळ चे अधिकारी कर्मचारी बस चालक हफ्ते घेत लाखोचा भ्रष्टाचार करत आहे. याबाबत शिवसेना माजी संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांन अहमदनगर येथील विभाग नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांना पुराव्यासह तक्रार करून कारवाई ची मागणी केली आहे.
सदर तक्रारीत कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात आपण कोणत्याही हॉटेल, ढाबा, रेस्टोरंट ला अधिकृत बस थांबा दिलेला नाही. मात्र कर्मचारी व संबंधित अधिकारी एक बस साठी 1500 रुपये हफ्ता घेऊन अनधिकृत बस थांबण्याची परवानगी देत आहे. संगमनेर येथील हॉटेल पुरोहित मांची व कोकणगाव, ता. संगमनेर, नगर- संगमनेर हायवे या ठिकाणी अनाधिकृत बस थांबत आहे. यापूर्वी देखील आपणास लेखी तक्रार केलेली होती. मात्र आपले स्तरावर कोणतीही कारवाई झाली नाही.
आपण ज्यांना कुणाला अधिकृत बस थांबा देतात त्यांच्याकडून लाखो रुपये डिपॉझिट घेतात. अनेक अटी शर्तीचे पालन करण्यास सांगतात, एका बस साठी 200 ते 400 रुपयांपर्यंत अधिकृत पैसे आकारतात, पाणी बॉटल आपल्याकडूनच अधिकृत असलेलेच विकत घ्यावे लागते, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत चहा, नाश्ता, जेवण विकता येत नाही, हॉटेल परिसराच्या आसपास किंवा हॉटेलमध्ये दारू विक्री करता येत नाही, ज्या ठिकाणी बस थांबा आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वच्छता ग्रह व स्वच्छतेबाबत विविध अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. आपला कोणताही अधिकारी कधीही येतो व दादागिरी करून फुकटचे जेवण करून जातो, एसटी बस चालक, कंडक्टर हे देखील प्रत्येक बस थांब्यावर पोटभर मनसोक्त फुकटचे जेवण करतात. दुपारी जर गाडी अधिकृत थांब्यावर थांबली तर संध्याकाळचे जेवण देखील पार्सल घेऊन जातात, जाताना कोल्ड्रिंक पाण्याच्या बाटल्या देखील मोफत घेऊन जातात. बस थांबा असलेल्या प्रत्येक फेरीसाठी 100 ते 200 रुपये बस चालक मागतात या सर्व गोष्टीमुळे अधिकृत बस थांबा वाल्यांना बस थांबा चालवणे परवडत नाही. परंतु आपले कर्मचारी, अधिकारी अनाधिकृत बस थांबा देण्यासाठी एका बससाठी 1500 रुपये हप्ता आकारतात व बाकी कोणत्याच अटी शर्थिची पूर्तता असेल नसेल याची पडताळणी देखील करत नाही. फक्त स्वतःचा खिसा गरम करून घेतात. यात एसटी महामंडळाला देखील लाखो रुपयांचा चुना लागत आहे. सदर अनधिकृत बस थांब्यावर कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही तसेच अन्नाची पातळी, स्वच्छतागृह व इतर कोणत्याही अटी शर्ती पाळलेल्या नसताना देखील फक्त आणि फक्त 1500 हप्ता मिळतो म्हणून प्रवाशांच्या जीवाशी आपले बस चालक व संबंधित कर्मचारी खेळत आहे. हे त्वरित थांबवले नाही तर परिवहन मंत्री यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या सर्व पारीनामा ची जबाबदारी आपली राहील याची दक्षता घ्यावी. म्हणूनच सदर बस चालक संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी अमर कतारी यांनी केली आहे.