ऑगमेंटेड रियॅलिटी, कियॉस्क, थ्रीडी वॉकथ्रू चा वापर
रायगड विकास प्राधिकरण व C-DAC यांच्या दरम्यान आज सामंजस्य करार संपन्न झाला. हा तंत्रज्ञान विषयक करार आहे. महाराष्ट्रातील एखाद्या किल्ल्यासंदर्भात होणारा देशातील पहिलाच करार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने दुर्गराज रायगडवर काम करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून ;
१. ‘थ्रीडी वॉक थ्रू’ या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रायगड किल्ला शिवकाळात होता तसा पुन्हा वर्चुअल रुपात उभा केला जाणार आहे. यासाठी सर्व इतिहास संशोधकांनी मदत घेतली जाणार असल्याने रायगड च्या शास्त्रीय जतन व संवर्धनासाठी हा मोठा माईलस्टोन ठरणार आहे.
२. मोबाईल टुरिस्ट गाईड: ‘अग्युमेंटेड रियालिटी’ तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि विशेष मोबाईल एप्लीकेशन द्वारे किल्ले रायगड वरील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती गडावर येणाऱ्या शिवभक्तांना मिळणार आहे. त्यासाठी किल्ल्यावर ठिकठिकाणी सेन्सर लावण्यात येणार आहेत.
३. कियॉस्क Experience Centre: रायगड ला भेट देणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांसाठी किल्ल्यावर सीडॅक तर्फे एक्सपिरीयन्स सेंटर उभारण्यात येणार असून त्यामध्ये रायगड ची इत्यंभूत माहिती पर्यटकांना मोठ्या स्क्रीन वर अनुभवता येणार आहे.
४. जतन प्रकल्प: गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित राज्यातील व देशातील सर्व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार असून शिवरायांशी संबंधित सर्व ऐतिहासिक कागदपत्रे एकाच पोर्टल वर त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प किल्ले रायगडच्या पायथ्याशी ८८ एकर मध्ये उभ्या राहणाऱ्या शिवसृष्टी व मराठा संशोधन केंद्राचा भाग असेल.
या महत्वपूर्ण बैठकीला सीडॅक चे कार्यकारी संचालक कर्नल ए के नाथ, सीडॅक च्या भारतभरातील विविध शाखांचे संचालक व अधिकारी,डॉ. दमोदर मगदूम रायगड विकास प्राधिकरण चा अधिकारीवर्ग उपस्थित होते.