मांडवेतील तलाठी लाचप्रकरणात दलालाची मध्यस्थी, तलाठी फरार

0
626

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -तालुक्यातील मांडवे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल विभागातील तलाठी अक्षय ढोकळे याने एका पत्रकाराच्या मध्यस्थीने राहुरी येथील खडी व्यवसायिकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार बुधवार, 16 एप्रिल 2025 रोजी उघडकीस आला. लाचखोरीची ही घटना मांडवे गावातील मारुती मंदिरासमोर रात्री 9 वाजता घडली.

लाच घेताना मध्यस्थ रमजान नजीर शेख (रा. मांडवे बु.) याला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, लाच स्वीकारणारा तलाठी अक्षय ढोकळे सध्या फरार आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, संबंधितांच्या संपत्तीची तपासणी, बँक खाती आणि घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
तक्रारदार हा राहुरी येथील खडी वाहतूक व्यवसायिक असून, महसूल विभागाकडून त्याच्या गाड्यांवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. पुढील अडचणी टाळण्यासाठी तक्रारदाराने तलाठ्याशी संपर्क साधला असता त्याने दर महिन्याला 40 हजारांची लाच मागितली. वारंवार होणार्‍या मागण्या आणि दबावामुळे तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.
रमजान शेख याने तक्रारदाराकडून 50 हजार रुपये घेताच त्याला अटक करण्यात आली. त्याने लाच स्वीकारताच तलाठ्याला फोन करून पैसे मिळाल्याचे सांगितले होते, त्यामुळे तलाठ्याचा सहभाग स्पष्टपणे सिद्ध होतो. मात्र अटकसत्राच्या वेळी तलाठी अक्षय ढोकळे फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात पत्रकार म्हणून ओळखला जाणारा रमजान शेख याच्या सहभागामुळे पत्रकारितेच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here