तीर्थरूप भाऊसाहेब थोरात… दादांसोबतच्या सुंदर आठवणींचा सुवर्णबंध !

0
178

अतिथीगृहातील कामाच्या दिवसांतून अनुभवलेली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची माणुसकी, शिस्त आणि आपुलकी सांगणारी हृद्य आठवण.

नक्की दिवस आठवत नाही, मात्र ते २००६ साल होते. माझे शिक्षण सुरू असतानाच मी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहामध्ये रात्रपाळीत काम करत होतो. माझ्या कामाचे दहा-बारा दिवस झाले असतील. अतिथीगृहामध्ये जनरल शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यावेळी कारखान्याचे गेस्ट हाऊस इन्चार्ज थिटमे साहेब यांनी मला सांगितले,
“तुला आज नाईट करून उद्या पुन्हा जनरल ड्युटी करायची आहे.” मी होकार दिला.

रात्रपाळी करून दिवसपाळी करण्यासाठी मी तयार होतो. सकाळचे साधारण साडेनऊ वाजले होते, तोच एका गाडीचा हॉर्न कानावर आला. ताबडतोब मी गाडीच्या दिशेने गेलो व दरवाजा उघडला. गाडीतून जे गृहस्थ उतरले, तेच दादा म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब थोरात. त्यांना मी पहिल्यांदाच पाहत होतो.
त्यावेळी दादांकडे पांढऱ्या रंगाची अॅम्बेसिडर गाडी होती. तसेच त्यांचे कार्यालय कारखान्याच्या अतिथीगृहातच होते. दादा ज्या ठिकाणी बसायचे, त्या ठिकाणी प्रवेश करताना समोरच माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचा अतिशय सुंदर, बोलका उभा फोटो लावलेला होता. गाडीतून उतरून दादा त्यांच्या काठीचा आधार घेत हळूहळू कार्यालयात गेले.

दादांच्या भेटीसाठी पठार व डोंगराळ भागातील काही कार्यकर्ते आले होते. धोतर नेसलेले, डोक्यावर मोठा पांढरा फेटा बांधलेले हे सर्व तिर्थरूप दादांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

खुर्चीवर स्थानापन्न होताच दादांनी टेबलवरील बेल वाजवली. पहिल्यांदाच ती बेल उचलायला जाणार होतो. त्यामुळे छातीत थोडी धाकधूक होतीच. हळूहळू पावले टाकत मी आत गेलो. मला पाहताक्षणीच दादांच्या लक्षात आले की मी नवखा आहे. माझी धाकधूक ओळखून त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले, “माझ्याजवळ उभा राहा.”
त्यांनी माझे नाव आणि गाव विचारले. थोड्या घाबरलेल्या आवाजात मी नाव सांगितले आणि गाव काकडवाडी. गावाचे नाव ऐकताच त्यांनी माझ्या पाठीवर हलकेच थाप दिली आणि म्हणाले,
“तू तळेगाव दुष्काळी पट्ट्यातून आला आहेस. चांगले काम कर.”

मी नवीन होतो आणि तिथे एकटाच आहे, हे दादांच्या लक्षात आले होते. त्यांनी मला सांगितले, “एका वाटीत साखर घेऊन ये.” मी साखर घेऊन आलो. दादा म्हणाले, “या सर्व कार्यकर्त्यांच्या हातावर थोडी-थोडी साखर दे.”
मी प्रत्येकाच्या हातावर साखर दिली; पण मला काहीच कळेना. नंतर लक्षात आले की मी नवीन व एकटाच असल्यामुळे, मला लगेच चहा बनवण्याच्या गडबडीत टाकण्याऐवजी, दादांनी प्रेमाने मला प्रत्येकाच्या हातावर साखर देण्यास सांगितले.

त्यानंतरही काम करत असतानाच्या तिर्थरूप दादांच्या अनेक आठवणी मनात जिवंत आहेत. त्यामध्ये गेस्ट हाऊसमध्ये सतत वाजणारा लँडलाईन फोन आणि त्यावर माझा त्यांच्याशी अनेकदा झालेला संवाद आजही स्पष्टपणे आठवतो.

आदरणीय तिर्थरूप दादा कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जात होते; पण सर्व घटकांची ते किती आपुलकीने काळजी घेत असत, याची ही छोटीशी आठवण आजही माझ्या काळजाच्या पटलावर कोरलेली आहे.

आज तिर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांची १०२ वी जयंती. या निमित्ताने त्यांच्या चरणी शतशः नमन…!

– विशाल काळे
(सोशल मिडिया समन्वयक, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here