युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यात नव्याने बनविलेले रस्ते देखील उखडले असून पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालक, पादचार्यांचे हाल होत आहे.
शहरातील अनेक भागात विकासकामे सुरू आहेत. त्यात रस्त्याचे, गटारीचे कामे देखील सुरू आहेत. तर काही रसत्यांचे कामे दोन तीन महिन्यांपूर्वीच झालेली आहेत. दरम्यान शहरात दोन चार वेळा दमदार पाऊस झाला. या पावसाने एकीकडे नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी शहर व उपनगरातील रस्त्यांची मात्र मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. यात शहरातील मोठा वर्दळीचा रस्ता असलेला अकोले बायपास हा रस्ता पेटिट सर्कल ते रहाणे मळा इथपर्यंत अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. नगरपालिकेने मुरुम टाकून काही प्रमाणात हे खड्डे बुजविले असले तरी पाऊस आणि वाहनांची मोठी वर्दळ यामुळे या मुरुमाची माती होऊन पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे.
संगमनेर शहराचा विस्तार वाढत आहे, अनेक उपनगरे निर्माण होत आहे परंतु त्यांना अजूनही पक्के रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत समस्या सतावत आहे. त्यात पावसाळ्यामुळे तर नागरीकांचे प्रचंड हाल होत आहे. मालदाड रोड, त्याला लागून असणार्या वसाहती, बाजारपेठ, जोर्वे नाका, कुरण रोड परिसरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून शहरात चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. पालीकेचे रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील रस्यांची ही दुरावस्था झाली आहे. पालीकेत प्रशासनराज असतांनाही हा प्रश्न चिंताजनक आहे.