१८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणुबॉम्ब चाचणी घेतली. अशा प्रकारच्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यूहरचनेच्या दृष्टीकोनातून कमालीची गुप्तता पाळण्यात येते. या मोहिमेचे नांव “स्मायलिंग बुद्धा” असे ठेवण्यात आले होते. अणुबॉम्ब चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व प्रसार माध्यमांनी “बुद्ध हसला” अशी बातमी प्रसिद्ध केली. बरोबर २४ वर्षांनी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना एपीजे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली ५ अणूस्फोटांच्या चाचण्या यशस्वी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी “आणि बुद्ध हसला” असा मथळा घेऊन बातमी प्रसारीत करण्यात आली.
मार्च २०२०, कोविड-१९ नावाच्या विषाणूने शेअर बाजारात पहिला विस्फोट घडवून आणला. दुःस्वप्न पडावं तसे निर्देशांक शिखरापासून कोसळत होते. २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स ३,९३५ पॉईंट आणि निफ्टी १,१३५ पॉईंट गडगडले आणि सर्वत्र हाहाकार माजला. संपूर्ण जगात टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी नुकसान सोसत विक्रीचा सपाटा लावला. पण ज्यांचे आर्थिक ध्येय निश्चित होते आणि आपल्या आर्थिक सल्लागाराच्या संपर्कात होते त्यांनी संयम ठेवून गुंतवणुका राखून ठेवल्या. किंबहुना काहींनी आपली गुंतवणूक कुठे आणि कशी वाढविता येईल? याची चाचपणी करायला सुरुवात केली होती.बफेट म्हणतात, “Stock Market is the device for transferring Money from the Impatient to Patient”.
रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करून जनतेच्या हातात पैसा खेळता राहिला यासाठी पाउल उचलले होते. कोविड काळात “वर्क फ्रॉम होम” संस्कृती जोर धरू लागली होती त्यामुळे “डीजिटल इंडीया” अस्तित्वात येऊ लागला होता. ऑनलाईन जाहिरातींच्या माऱ्याने जणू सर्वकाही मोफत झालंय असंच वातावरण निर्माण झालं. प्रत्येकाला शेअर बाजाराचे आकर्षण वाटू लागले. मार्च २०१९ पर्यंत ३.६ कोटी असलेला डी-मॅट खात्यांचा आकडा नोव्हेंबर २०२१ पर्यंत ७.७ कोटी पर्यंत पोहचला होता. चढत्या बाजारात प्रत्येक जण तज्ञ असतो आणि पडत्या बाजारात चिंतनशील सुज्ञ. गुंतवणूकदारांनी जेव्हा खरेदी केली पाहिजे तेव्हा सुस्त होतात आणि विक्री केली पाहिजे तेव्हा सुसाट असतात.बफेट म्हणतात, “Be Fearful when others are Greedy”.
गेल्या २ वर्षात एकाही गुंतवणूकदाराने फोन केला नव्हता. कारण पोर्टफोलिओ हिरवा शालू नेसून लोभस दिसत होता. पण मागच्या २ आठवड्यांपासून किमान २० फोन आले असतील. पोर्टफोलिओचा परतावा नकारात्मक दिसतोय, काय करायचं? एडलवाईज म्युच्युअल फंडाच्या प्रमुख राधिका गुप्ता यांची मागच्या आठवड्यात मुलाखत ऐकण्याचा योग आला. त्यांचा गुंतवणूकदारांचे वर्तनशास्त्र यावर चांगला अभ्यास आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार गुंतवणूकदारांची जोखीम क्षमता एकतर आभासी कूट चलन (क्रिप्टो करन्सी) किंवा मुदत ठेव(एफडी) अशा दोन टोकांवर असते आणि समभाग सलंग्न म्युच्युअल फंडांचा परतावा या दोन्हींच्या मधे असतो. बाजार अस्थिर होऊ लागला कि गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओची तुलना एफडीच्या व्याजदरांशी करू लागतात. हिच का ती अर्थसाक्षरता? असा प्रश्न पडू लागतो. बफेट म्हणतात, “The Rich invest in Time & the Poor invest in Money”.
मुद्दाम काही संवाद नमूद करतो. कदाचित वाचकांपैकी काही जणांना त्यांच्या मनातील शंकांचे योग्य ते उत्तर मिळू शकेल.
- सहामहिन्यातदामदुप्पटहोईल अशी गुंतवणूक शोधणारा अमीत१०%ची जोखीम घेण्यास तयार झाला. त्याच्या मुद्दलात ४% घट दिसली तेव्हा आपले “आर्थिक ध्येय” त्याच्या नजरेस दिसू लागले.
- मी दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतोय. तेव्हा जोखीम घेतली तरी हरकत नाही. पण १०व्या महिन्यातच गुंतवणूकीचे मोजमाप करून चलबिचल होणारे सुशांत.
- २,००० ची एसआयपी किमान १० वर्ष तरी सुरु ठेवणार असा निर्धार केलेला गिरीष. पूर्ण १ वर्षही होत नाही तोवर तातडीची गरज म्हणून बंद करायला आला. पण नेमकं कारण काय? हे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पडता बाजार आहे, हे लक्षात आलं.
- फेब्रुवारीत १ लाख एकरकमी व १०,००० ची एसआयपी सुरु करणारा भावेश. जूनमधे मुलांचे शैक्षणिक खर्च आणि व्यवसायातील उलाढाल कमी होईल म्हणून ५,००० ने एसआयपी कमी करावी, असे सांगत होता. पण खरं कारण तर मला माहितच होतं.
- या उलट अविनाशचा फोन काही संधी आहे का?
नोव्हेंबर २१ मधे ६२,५०० असलेला सेन्सेक्स ५३,००० च्या पातळीवर आला आहे. मार्केट अजून किती खाली जाईल? असा प्रश्न विचारणारे असंख्य लोक भेटतात. किती खाली गेल्यावर तुम्ही गुंतवणूक करणार? असा प्रश्न मी विचारल्यावर उत्तर कोणीही देत नाही. बफेट सल्ला देतात कि जर तुम्ही “समभाग सलंग्न गुंतवणुका १० वर्षांसाठी करणार नसाल तर त्यांचा विचार १० मिनिट देखील करू नका”.नव्वदी पार केलेले बफेट अजूनही दिर्घ मुदतीच्या गुंतवणूकीच्या शोधात असतात. आणि २९ वर्षांचा मुकेश आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओतून लिस्टिंगच्या दिवशी १००% लाभ मिळविण्याचे स्वप्न बघतोय.
अशा गुंतवणूकदारांना बघून बफेट नक्कीच हसत असतील.
– अतुल कोतकर
गुंतवणूक सल्लागार
94 23 18 75 98