भाजपामधून शिवसेनेमध्ये प्रवेश करून धनत्रयोदशीला भरणार उमेदवारी अर्ज
अप्रत्यक्षपणे विखे पिता-पुत्र संगमनेरमध्ये राहणार सक्रिय
विखेंची माघार की राजकीय तडजोड
डॉ. सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने प्रचाराचा धडाका लावला होता त्यावरून तेच उमेदवार असतील असे निश्चित मानले जात होते. परंतु कालच्या अंभोरेच्या सभेत यापुढे माझ्या सभा नाही असे सांगत एकप्रकारे आपण उमेदवार नसणार असे संकेत दिले होते. या पाठीमागे मोठी खेळी असल्याचे देखील बोलले जात आहे. विखे यांचा नगर दक्षिणमध्ये पराभव झाला होता, आणि आ. थोरात यांचा पराभव करणे तीतकेच सोपे नाही. त्यातच धांदरफळ मध्ये घडलेल्या घटनेने थोरातांना आयताच फायदा झाला होता. त्याचबरोबर येथे जास्त लक्ष घातल्यास त्याचा परिणाम शिर्डीवर होऊ शकतो या सर्व पार्श्वभूमीवर विखे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याचे बोलले जाते.
संगमनेर (प्रतिनिधी) –
राज्यात विधानसभेचे पडघम जोरात वाजू लागले असताना संगमनेरात मात्र महायुकडून उमेदवाराविना जोरदार प्रचार सुरू होता. आणि या प्रचाराने आघाडी घेत आता संगमनेरमध्ये परिवर्तन होणार का ? अशी चर्चा रंगू लागलेली असताना अचानक या निवडणुकीने वेगळे वळण घेतले आहे. डॉ. सुजय विखे हेच महायुतीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले असताना आज संध्याकाळी अचानक भाजपचे अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु त्यासाठी त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटात पाठविण्यात आले आहे. मात्र या अकस्मात घडामोडींमुळे संगमनेर भाजपला मोठा धक्का बसला आहे आणि अचानक शिंदेंच्या शिवसेनेला लाॅटरी लागली आहे. आता काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात विरूद्ध महायुतीचे अमोल खताळ अशी लढत रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या मंगळवारी शेवटची मुदत आहे.
मात्र संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर कोण याचे निश्चित उत्तर मिळत नव्हते. माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी संगमनेर विधानसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त करीत मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभांचा धडाकाही लावत वातावरण निर्माण केले होते. थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांची पेमगिरीपासून सुरु झालेली युवासंवाद यात्रा आणि माजी खासदार डॉ. विखे यांनी तळेगाव गटापासून सुरु केलेली युवासंकल्प यात्रेने संगमनेर विधानसभा मतदारसंघ ढवळून निघाला होता. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपाने थोरात विरुद्ध विखे असाच सामना होईल असेही कायास लावले गेले, मात्र ऐनवेळी विखे यांनी माघार घेत सरतेशेवटी अमोल खताळ यांच्या गळ्यात संगमनेरची उमेदवारीची माळ टाकण्यात आली. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी खताळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान उमेदवार जरी अमोल खताळ असले तरी दोन्ही विखे यांच्या सक्रिय सहभागाने येथील निवडणुक रंगतदार होणार आहे यात शंका नाही.