आ. तांबे, आ. खताळ यांच्यासह सर्वपक्षीय नेते मोर्चात सामिल
युवावार्ता (प्रचिनिधी)
संगमनेर – बांगलादेशामध्ये हिंदू समाज बांधवांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. हा अन्याय अत्याचार तेथील हिंदू समाज प्रचंड आक्रोश करत सहन करत आहेत. तेथील हिंदू समाजावरील होणारे हल्ले थांबले पाहिजे, त्यांना पुरेसे संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत तसेच बांगलादेशी घुसखोरांची येथून हाकालपट्टी करावी या मागणीसाठी संगमनेरात आज सकल हिंदू समाजाने भव्य हिंदू रक्षा मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. या मोर्चाला विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे, नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांगलादेशामध्ये जवळपास सव्वा कोटी हिंदू बांधव वास्तव्यास आहे. त्यांना बांगलादेशी नागरिक विनाकारण त्रास देत धर्माच्या नावावरती त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहे. बांगला देशातील हिंदूंची मंदिरे पाडले जात आहे. देवांच्या मुर्ती फोडून त्यांची विटंबना केली जात आहे. हिंदूंच्या पवित्र गायींची निर्दयीपणे कत्तली केल्या जात आहे. सध्याच्या काळात, बांगलादेशात हिंदू समुदाय अजूनही धार्मिक छळ, जमीन हस्तांतरण आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित आहे. त्यांना धार्मिक तणाव आणि कधी कधी, दहशतवादाचा सामना देखील करावा लागतो. अशा परिस्थितीत, बांगलादेशी हिंदूंच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि त्यांना सामाजिक आणि राजकीय संरक्षण मिळवून देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बांग्लादेशमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून, उध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे. बांग्लादेश मधील हिंदूविरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे कि, हिंदू महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. बांग्लादेश मध्ये काही ठिकाणी तर हिंदूंवर अत्याचार होत असताना चांग्लादेशाचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे.
बांग्लादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणार्या राज्यसंस्थाच अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणार्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांग्लादेशातील अस्तित्व धोक्यात येईल. बांग्लादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एकराष्ट्र म्हणून बांग्लादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदू नामानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणार्या नागरिकांची आहे. बांग्लादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे. आज हिंदूसमाजात असलेला रोष या मानवाधिकार मूक मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
या हल्ल्यांच्या निषेधार्थ संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू रक्षा मोर्चा शहरातील लालबहादूर शास्त्रीचौक या ठिकाणावरून सकाळी सुरू झाला. मेन रोड, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे येथील प्रातकार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी छोटेखानी सभा होऊन यात उपस्थित मान्यवरांनी बांगला देशातील कट्टर पंथीयांकडून होणार्या क्रुरतेचा निषेध केला. यावेळी प्रा. एस. झेड. देशमुख, डॉ. जयश्री थोरात, कुलदिपसिंह ठाकूर, अक्षय थोरात, ज्ञानेश्वर कर्पे, योगेश सुर्यवंशी, राजाभाऊ देशमुख, अमर कतारी, सिताराम मोहरीकर, सुदर्शन इटप, राहुल भोईर, अर्जुन काशिद, तुषार ठाकूर, सुनिल ऊकिर्डे, रमेश काळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.