लोखंडे निष्क्रिय खासदार – भाऊसाहेब वाकचौरे हे तुप चोर पुढारी
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर
शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे निष्क्रिय खासदार असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डीचे उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे. ज्या खासदाराला आपल्या मतदारसंघांमध्ये कोणी ओळखत नाही त्याला जनतेने का मतदान करावे. अशी टिका भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यावर केली आहे. तर साईबाबांचे नाव घेऊन तुप चोरणाऱ्या वाकचौरे यांना मतदारांनी घरी बसवले आहे.
शिर्डी मतदारसंघात १३ मे रोजी मतदान आहे. परंतु आता हळूहळू शिर्डीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. दरम्यान निष्क्रिय व मिस्टर इंडिया खासदार म्हणून प्रसिद्ध असलेले महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी बदलण्याचे संकेत वारंवार मिळत आहे. परंतु सदाशिव लोखंडे हे उमेदवार राहतील असे चित्र सध्या दिसत असून लोखंडे मतदारसंघात जोरदार प्रचार करताना दिसत आहे. तर महाआघाडीचे उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर पक्षांतर्गत नाराजी तसेच काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) यांच्या कार्यकर्त्यांची मिळत नसलेली साथ यामुळे ते देखील एकटेच प्रचार करताना दिसत आहे. दरम्यान दोन्ही उमेदवारांनी सध्या भेटीगाठीवर जोर दिला असून वेळ मिळेल तसे एकमेकांवर आरोप करत आहेत.
सदाशिव लोखंडे हे निष्क्रिय खासदार होते व मतदारसंघात त्यांना कुणी ओळखत देखील नाही यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते. माझ्यावरती शिर्डी संस्थानमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करत आहे तो एकही आरोप सिद्ध झाले नाही नसून माझे काम बघून त्या ठिकाणी मला वेतन वाढ देण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अकोले तालुक्यातील लिंगदेव या ठिकाणी बोलताना सांगितले.
दरम्यान खासदार लोखंडे यांच्यावर घनवट यांनी देखील कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले आहे. तर लोखंडे यांनी देखील पलटवार करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे. वाकचौरे हेच तुप चोर असून त्यांना माझ्यावर आरोप करण्याचा कुठलाही अधिकार नाही असे म्हटले आहे. प्रत्यक्ष निवडणूक जसजशी जवळ येऊन तशी या आरोपांना धार येणार आहे.