कर्तृत्ववान व कुटुंबवत्सल महिला नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर शहराच्या मा. नगराध्यक्षा आदरणीय सौ. दुर्गाताई तांबे यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा


संगमनेर तालुक्यात प्रवरानदीच्या कुशीत संगमनेरच्या पूर्वेला, श्री क्षेत्र दत्त महाराजांच्या पावन भुमीत वसलेले जोर्वे गाव. जोर्वे संस्कृती म्हणून दिल्लीच्या पुरातत्व विभागाच्या म्युझियममध्ये या गावाला विशेष स्थान आहे.
या गावातील कष्टाळूवृत्ती, पुरोगामी विचार, धर्म समभावाची वागणूक, नेतृत्वगुण, दूरदृष्टी व अध्यात्मिकता असणारा थोरात परिवार. या परिवारातील थोर स्वातंत्रसेनानी आदरणीय स्व. भाऊसाहेब थोरात व स्व. मथुराबाई थोरात यांच्या पोटी 6 जुलै, 1959 रोजी एका गोंडस कन्यारत्नाने जन्म घेतला. ते कन्यारत्न म्हणजेच संगमनेर शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे. दुर्गाताईंचे प्राथमिक शिक्षण जोर्वे या गावीच झाले. पुढे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच संगमनेर येथे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून, पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी बी.ए. ऑनर्स ही पदवी मिळवली.
थोरात कुटुंबातील ही कन्या 10 फेब्रुवारी 1981 रोजी निष्णांत सर्जन व प्रतिथयश डॉक्टर, डॉ. सुधीरजी तांबे यांची अर्धांगिणी म्हणून तांबे घराण्याची सूनबाई झाली. रक्तातच समाजसेवा व राजकारणाचे बाळकडू असल्यामुळे महिलांचे संघटन, समाजसेवा यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि सन 2006 रोजी त्या संगमनेर नगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर 2011 ला दुसर्‍यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. नगरसेवकांमधून निवडून येत संगमनेर शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा त्या झाल्या. 2016 मध्ये पार पडलेल्या ‘लोकनियुक्त नगराध्यक्षा’ पदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी त्या विजयी झाल्या. नगरपालिकेच्या 150 वर्षाच्या इतिहासात प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.


नगराध्यक्ष झाल्यानंतर संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. सलग 12 वर्षे त्या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहत असताना त्यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ चा नारा दिला. प्रथम ओला कचरा, सुका कचरा वेगळा करुन ओल्या कचर्‍यापासून कचरा डेपोवरती वीजनिर्मिती प्रकल्प, शेतीला पूरक व पोषक खतांची निर्मिती प्रकल्प उभारला. हे करीत असतानाच स्वातंत्र्यसेनानी स्व.भाऊसाहेब थोरातांनी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानार्तंगत संगमनेर तालुक्यात शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी, व्यापारीवर्ग, सर्व कार्यकर्ते व महिला भगिणी, वेगवेगळ्या संस्था यांना सोबत घेऊन 30 कोटी बियांचे रोपण व 80 लाख वृक्षांची लागवड केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तालुक्यात 2100 हून अधिक महिला बचत गटांची स्थापना केली. शहरात 35 गार्डनची निर्मिती केली.
संग्राम संस्थेच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी शाळा सुरु करून त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात संगमनेर शहराच्या वैभवात भर पाडणार्‍या विविध इमारतींचे बांधकाम, निळवंडे धरणातून शहरवासियांसाठी पाणीपुरवठा योजना अशी विविध लक्षणीय कामे पूर्ण केली.
सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे संगमनेर नगरपालिकेची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली. दुर्गाताईंच्या नेतृत्वामुळे संगमनेर नगरपालिकेला अभिनेते अमिताभ बच्चन यांचे हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे उपस्थितीत स्वच्छतेचा राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार बहाल करण्यात आला.
ताईंना त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सन 2014-15 चा राज्यस्तरिय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा सन 2016 चा ‘उत्कृष्ठ नगरपालिका’ पुरस्कार असे विविध पुरस्कार ताईंच्या नेतृत्वात मिळाले.


ताईंच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर त्या अतिशय प्रेमळ, कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय, हजरजबाबी आहेत. नीटनेटकेपणा व परखडपणा हे गुण त्यांच्या स्वभावात आहेत.
समाजात काम करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाची तेवढीच काळजी घेतली. घरात एवढे नोकर-चाकर असतानाही आपल्या सासू-सासर्‍यांची त्यांचे आजारपणात खूप काळजी घेतली. सासू सासर्‍यांच्या खाण्यापिण्याकडेे त्यांचे जातीने लक्ष असायचे. त्याबरोबर आपल्या दोन्ही मुलांवर त्यांनी उत्तम संस्कार केले. त्यांना उच्चशिक्षण दिले. त्यांचे मोठे चिरंजीव आमदार श्री. सत्यजित तांबे यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर उमटविला आहे. छोटे चिरंजीव डॉ. हर्षल तांबे यांनीही वैद्यकीय क्षेत्रात एसएमबीटी घोटीच्या माध्यमातून रुग्णांना उत्कृष्ट सेवा देऊन चांगला नावलौकिक मिळवला. आपल्या दोन्हीही सूनांची सासू न होता त्या आई झाल्या. नातवंडांची लाडकी ’ग्रॅन्ड माँ’ झाल्या.
संगमनेर तालुक्याचे आधारवड, राज्याचे माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात हे ताईंचे थोरले बंधू. ताईंचे बंधुप्रेम सर्वांनाच ज्ञात आहे. सासरच्या कुटुंबाप्रमाणे आपल्या माहेरीही त्यांनी त्यांचे आई-वडील, भाऊ-वहिनी, सर्वांना खूप प्रेम दिले. त्यांचीही त्या सतत काळजी घेत असतात.
एक आदर्श मुलगी, आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श भगिणी व संगमनेर शहरातील सर्व भगिणींची प्रेमळ सावली, प्रेमळ माय म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. या प्रेमळ माऊलीला परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराजवळ प्रार्थना.

संगमनेर नगरपरिषद, संगमनेर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख