वीरगावात बिबट्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला

0
1955

बिबट्यांचा मानवी वस्तीत शिरकाव, वाढते हल्ले चिंताजनक

विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये धास्ती
वीरगाव परिसरात भर दिवसा बिबट्याने हल्ले होत असल्याने ग्रामस्थ भयभीत आहेत. या शिवारात अनेक बिबटे असण्याची शक्यता असून शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना बिबट्याच्या दहशतीखाली ये जा करावी लागते. त्यामुळे पालक आणि शिक्षकही चिंतेत आहेत. शाळेत येताना आणि जाताना पालकांनी शक्यतो काही दिवस पाल्याची सोबत करावी आणि नागरिकांनीही रात्री-अपरात्री फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन वनखात्याने केले आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी) वीरगाव – शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान सर्वत्र शेतकर्‍यांची आणि दुध उत्पादकांची वर्दळ सुरु असताना बिबट्याने अकोले तालुक्यातील वीरगाव येथे दोघांवर जीवघेणा हल्ला केला. तसेच इतर दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. बस्तीराम रामचंद्र गांगड, माधव पोपट देशमुख या दोघांवर बिबट्याने हल्ला करुन या दोघांनाही जबर जखमी केले तर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे यांचेवरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ला करणारी मादी असल्याने तिचे पिलांसहित शिवारात वास्तव्य आहे. पिले चुकल्याने त्यांचे शोधासाठी मादीने या सर्वांवर हल्ला केला. बिबट्याच्या दहशतीने गावात दहशत निर्माण झाली असून दिवसाढवळ्या हल्ले झाल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.

गावठाण आणि शिवारात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी होती परंतू बिबट्यांनी हल्ले केल्याने ही संख्या आता नगण्य आहे. अनेकांच्या पशुधनावरही हल्ले सुरुच आहेत. भक्ष्याची विवंचना सुरु झाल्याने बिबट्यांनी आता थेट मानवी वस्तीत प्रवेश केला आहे. आता बिबट्यांनी थेट माणसांनाच आव्हान दिले असून हे हल्ले वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. यापुर्वी वनखात्याकडे वेळोवेळी मागणी करुनही पिंजरा लावण्यात अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने आता शेतकर्‍यांमध्ये वनखात्याविरोधात तिव्र रोष निर्माण झाला आहे.

दरम्यानच्या काळात वनखात्याला ही बातमी कळविली असता वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. सोबत तीन पिंजरे घेऊन ही कुमक हजर झाली. पिंजरे शिवारात लावले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. बिबट्याचे एक पिल्लू बाळासाहेब कडलग यांचे शेतातील गिन्नी गवतात मिळून आले.जखमी झालेले बस्तीराम गांगड यांना प्रथमोपचारानंतर नाशिक येथे हलविण्यात आले तर माधव देशमुख हे संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वनखात्याचे वन अधिकारी धिंदळे, वनपाल पंकज देवरे अधिकारी आणि सर्व वन कर्मचारी बिबट्याचा वावर असणा-या परिसरात ठाण मांडून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here