एनटीएकडून नीटच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

0
1081

लाखो विद्यार्थ्यांचें भवितव्य टांगनिला – डॉ. गुंजाळ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
2024 मध्ये निकाल जाहीर झालेल्या मेडिकल एंट्रन्स एक्झाम ( नीट ) ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांवर एनटीए कडून अन्याय झालेला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून शासनाने याची दखल घेऊन परीक्षा पुन्हा घेऊन विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करावा. अशी मागणी संगमनेर येथील व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. हर्षवर्धन गुंजाळ यांनी केली आहे.
या परीक्षेच्या निकालात अनेक अनाकलनीय गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर निकाल 14 जूनला जाहीर करणार असे कळवून तो चार दिवस अगोदर 10 जूनला जाहीर केला. पैकीच्या पैकी मार्क सहसा कोणाला पडत नाहीत परंतु यावर्षी मात्र 67 जणांना 720 पैकी 720 मार्क्स मिळालेले आहेत. पहिल्या शंभर पैकी सात मुले एकाच हरियाणा या केंद्रातून आहेत. तामिळनाडू व बिहार या केंद्रावरही हीच परिस्थिती आहे. त्यातील काहींनी तर फॉर्म भरताना आपली आडनावे ही लावलेली नाहीत. नियमानुसार उशिरा आलेल्या मुलांना ग्रेसमार्क द्यायचे असे असताना हजारो मुले उशिरा येऊनही काही मुलांनाच ग्रेसमार्क कसे दिले? हा ही प्रश्‍न आहे. नीट च्या निगेटिव्ह सिस्टिम मार्क्स देण्याच्या पद्धतीमध्ये 718 व 719 मार्क्स कसे मिळाले? असे अत्यंत गंभीर प्रश्‍न पालक व विद्यार्थी विचारत आहेत. वर्षभर अभ्यास करूनही पेपर लीक झाल्याने अनेक पालकांची व विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळतात. स्पर्धा परीक्षांचा हा अनागोंदी कारभार थांबला पाहिजे. गेल्या दोन वर्षात स्पर्धा परीक्षांच्या सर्वच परीक्षेमध्ये अत्यंत गंभीर चुका होत आहेत. याची शासनाने दखल घेऊन अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. जे विद्यार्थी उद्या प्रशासनात जाऊन देशाचे भविष्य घडवणार आहेत त्यांच्या भविष्याशी पर्यायाने देशाच्या भविष्याशी असा खेळ करणे योग्य नाही. असेही डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ म्हणाले. यात सुधारणा झाली नाही तर विद्यार्थी व पालक आंदोलन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here