दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून आता पेरण्यांना वेग येणार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस अगदी वेळेवर सुरू झाला असून संगमनेर तालुक्यात मागील चार दिवसांपासून विविध ठिकाणी तो जोरदार बरसत आहे.
काल मंगळवारी सायंकाळी सुमारे तीन तास मुसळधार पावसाने संगमनेर शहराला तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांना झोडपून काढले. या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले झालेच शिवाय शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. यामुळे वाहतूक ठप्प झालीच शिवाय व्यापार्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने त्याखाली वाहनांचे देखील नुकसान झाले. त्यात कहर म्हणून नेहमीप्रमाणे वीज गायब झाली आणि रात्री उशिरा आल्याने नागरीकांना प्रचंड उकाड्यात रात्र काढावी लागली. परंतु दुसरीकडे दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून आता पेरण्यांना वेग येणार आहे.
संगमनेर शहरात सायंकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि हळूहळू या पावसाने जणूकाही रौद्ररूप धारण केले. त्यामुळे सर्वच रस्त्यांवरील फेरीविक्रेते, पादचारी, दुचाकीस्वारांची एकच धांदल उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाजारात आलेल्या महिला व वृद्धांना दुकानांचा आसरा घ्यावा लागला. सलग दोन तास दमदार पाऊस आल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली जावून रस्त्याना नदी, ओढ्याचे स्वरूप आले. नवीन नगर रोड, बसस्थानक परिसर, शिवाजी महाराज पुतळा, नाटकी नाला, बाजार पेठ, मेनरोड , मालदाड रोड, नवीन अकोले रोड, जोर्वे नाका, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, घास बाजार, रंगार गल्ली आदींसह संपूर्ण शहरातील रस्त्यावरून पुरासारखे पाणी वाहत होते. दीड ते दोन फूटावर वाहणार्या या पाण्यामुळे त्यात काही दुचाकी वाहून जाऊ लागल्या. परंतु धाडस करून नागरीकांनी या गाड्या वाचविल्या. गटारांच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने चिखल साचला, तर नवीन नगर रोडवरील दुकानांत पाणी शिरले. यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः फेरीवाल्यांचे देखील मोठे हाल झाले. संगमनेरात झालेल्या मुसळधार पावसाने व त्यानंतर संगमनेरात आलेल्या पुराने नगर पालीकेच्या आणि महावितरणच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळ्या आधी केलेली कामे केवळ कागदवरच असल्याचे दिसून आल्याने या पावसाचे पाणी व्यापार्यांच्या दुकानात आणि नागरीकांच्या घरात घुसले आहे. याबबात सोशल मिडीयावर नागरीकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
नैऋत्य मौसमी पाऊस मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील 24 तासांतही राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
सोमवारपर्यंत मौसमी वार्यांनी निम्मा महाराष्ट्र व्यापला होता. त्यामुळे पुढील 3 दिवसांत विदर्भासह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान वार्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो. त्यामुळे वादळाच्या स्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना मोबाईलचा वापर करू नये तसेच झाडाखाली थांबू नये. घरातील विजेची उपकरणे बंद ठेवावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.